नागपूर: माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य यांच्यासह बंधू प्रफुल्ल वैद्य वहिनी वर्षा वैद्य यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा
fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

बँक ऑफ बडोदाची (Bank of Baroda) 2 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष प्रशांत वैद्य (Former International cricketer Prashant Vaidya) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रशांत वैद्य यांच्यासोबतच बंधू प्रफुल्ल श्रीधर वैद्य (Sridhar Vaidya) आणि वहिनी वर्षा प्रफुल्ल वैद्य (Varsha Prafull Vaidya) (सर्व रा. पुष्पकुंज कॉम्प्लेक्‍स, न्यू सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ) यांच्या विरोधातही फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हे प्रकरण जमीन, जमीनीची मालकी, कर्ज आणि फसणूक अशा विविध विषयांशी संबंधीत असून काहीसे गुंतागुंतीचे आणि बँक ऑफ बडोदाशी संबंधीत आहे. प्राप्त माहितीनुसार प्रफुल्ल वैद्य हे संचालक असलेल्या भूपती स्टील या कंपनीने बँक ऑफ बडोदाच्या राणी दुर्गावती चौकातील शाखेकडून कर्ज घेतले. परफुल्ल वैद्य व प्रशांत वैद्य यांनी भूपती स्टील कंपनीकरिता भांडवल उभारण्यासाठी बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले होते. कर्जाला तारण म्हणून जमीनीचे कागदपत्र देण्यात आले होते. हे कर्ज बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक वामन हेडाऊ यांनी मंजूर केले. कर्जाची रक्कम २ कोटी ४० लाख रुपये इतकी होती. हे कर्ज घेण्यासाठी भूपती स्टील कंपनीच्या नावाने ओव्हर ड्राफ्ट बॅंक खाते उघडण्यात आले. या खात्यातून अनेकदा पैसे काढल्यावर हे खाते १२ एप्रिल २०१६ ला बंद करण्यात आले. दरम्यान, खाते बंद झाले. मात्र कर्जाच्या रकमेची परतफेड झाली नाही. त्यामुळे या कारणाचा शोध घेण्यासाठी बँक व्यवस्थापनाने कर्जप्रकरणात तारण आलेल्या जमिनीचे दस्तावेज तपासले असता बँकेला धक्कादायक माहिती आढळून आली.

कर्ज प्रकरणात तारण ठेवण्यात आलेल्या जमीनीची कागदपत्रे ही कर्जदारांपैकी कोणाच्याच नावावर नव्हती. जमिनीच्या कागदपत्रांवर उल्लेख केलेले गट क्रमांक, खसारा क्रमांक यात मोठी तफावत होती. तसेच, या कागदपत्रांवरील जमीन भलत्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच व्यवस्थापणाचे धाबे दणाणले त्यांनी अधिक चौकशी करता या जमिनीचे मूळ मालक संतोष बडवे हे असून आता ही जमीन त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर संतोष बडवे यांच्या नावाने आहे, अशी माहिती बँक व्यवस्थापणास मिळाली. विशेष म्हणजे या जमिनीबाबत न्यायालयात वाद सुरु असल्याचेही समजले. एकूण प्रकार लक्षात आल्यावर बँक व्यवस्थापनाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेने विशेष अशी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे बँकेने थेट न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंत गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा, आर्थिक फसवणूक प्रकरणी डीएसके समूहाची 904 कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त)

दरम्यान, कर्जासाठी तारण म्हणून दिलेल्या . मौजा द्रुगधामना परिसरातील ७/१२ वरील १२ (अ) आणि ८ (अ) मधील खसरा क्रमांक ७२/१ या १.७५ हेक्‍टर जमीन ही संतोष बडवे यांच्या नावे आहे. मात्र, ही जमीन (खसरा क्रमांक ७२/१ ) संतोष बडवे यांच्याकडून 2001मध्ये खरेदी केल्याचा प्रफुल्ल वैद्य यांचा दावा आहे. त्या काळात प्रफुल्ल वैद्य हे स्टील कॅरिअर या कंपनीत भागीदार होते.