पुण्यातील लोकप्रिय बिल्डर डी.एस.कुलकर्णी (D. S. Kulkarni) यांची तब्बल 904 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त झालेल्या मालमत्तेमध्ये जमीन, इमारत, सदनिका, विमा योजना, गुंतवणूक आणि बँकांतील रोख ठेवींचा समावेश आहे. डीएसके समूहाने गुंतवणुकदारांची 1 हजार 129 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे आहे. याबाबत डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या तिघांनी डी.एस.के. नावाने आठ भागीदारी संस्था उघडल्या, त्या डीएसकेचाच भाग आहेत असे दाखवून लोकांकडून ठेवी घ्यायला सुरुवात केली. 2006 ते 2013 या कालावधीमध्ये त्यांनी 3 हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा करून घेतल्या. पैकी 35 हजार गुंतवणूकदार, ठेवीदारांनी ठेवलेल्या 1 हजार कोटी पेक्षा जास्त ठेवींचा अपहार केला. ही रक्कम प्रथम हेमंती कुलकर्णी यांच्या खात्यात जमा केली जात असे. तेथून ती इतर कंपन्या व दीपक कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी व इतर नातेवाईक यांमध्ये वर्ग केली जात असे़. या पैशातून त्यांनी पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कर्नाटक, तामिळनाडू येथे मालमत्ता खरेदी केली. तसेच पुढील तपासात अमेरिकेत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पाठवून तेथे मालमत्ता खरेदी केल्याचे दिसून आले आहे़. (हेही वाचा : अलिबाग येथील नीरव मोदी याच्या बंगल्यात सापडला दुर्मिळ वस्तूंचा खजिना)
गेल्या वर्षी जुलैमध्ये ‘ईडी’कडूनही या प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली होती. आता या जप्तीनंतरही डीएसके यांनी अजून कोणते गैरेव्यवहार केले आहेत का याचा तपास ईडीकडून घेण्यात येणार आहे.