अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (Enforcement Directorate) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तिसरा समन्स बजावला आहे. त्यांना 5 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी मंगळवारी त्यांना ईडीने समन्स बजावले व सकाळी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी त्यांचे वय, आरोग्य आणि कोरोनाचा हवाला देऊन त्यांना जाण्याचे टाळले. आपल्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे हे ईडीने सांगावे अशी विचारणा करण्यासाठी त्यांनी आपला वकील पाठविला होता. अनिल देशमुख यांनी 8 दिवसांची मुदतवाढ मागितली होती.
दुसरीकडे आज अनिल देशमुख सकाळी अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. सांगितले जात आहे की, घडल्या प्रकरणाबाबत बड्या वकिलांशी सल्लामसलत केल्यानंतर ते दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्सकडून 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर ईडीने त्यांना समन्स पाठवले होते. गेल्या मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले. परंतु अनिल देशमुख यांनी थेट हजर होण्यास असमर्थता व्यक्त केली होती आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेत्यांचे उत्तर घ्यावे अशी विनंती केली होती.
यानंतर ईडीने त्यांना सहा मुद्द्यांवरील उत्तरे आणि कागदपत्रे मागितली होती. त्यांना त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या सर्व मालमत्तांचा तपशील विचारला होता. मागील पाच वर्षांच्या प्राप्तिकर परताव्याशी संबंधित सर्व कागदपत्रे मागितली होती. त्यांनी पीएस आणि पीए संदीप पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्याशी केलेल्या आर्थिक व्यवहारांबद्दल सविस्तर माहिती मागविली होती. या दोघांच्या संभाषणाचा तपशील मागितला होता. नागपूरच्या साई एज्युकेशन इन्स्टिट्यूटशी अनिल देशमुख यांचे असलेल्या कनेक्शनची माहिती मागितली होती. (हेही वाचा: Maharashtra: माजी गृहमंत्री अनिल देशमुख अचानक दिल्लीत रवाना)
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने पुन्हा या संदर्भात चौकशीसाठी देशमुख यांना समन्स बजावले असून 5 जुलै रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. याआधी दोन वेळा देशमुख चौकशीसाठी हजार राहील नाहीत. आता ईडीने त्यांना तिसरा समन्स बजावला आहे.