Flipkart Signs MoU With Maharashtra Government: आता पैठणी साडी, सावंतवाडीची लाकडी खेळणी, हिमरु शाली यांना मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ; महाराष्ट्र सरकारचा फ्लिपकार्टसोबत करार
Flipkart Signs MoU With Maharashtra Government (Photo Credit : Twitter)

ई-कॉमर्स मार्केटप्लेस फ्लिपकार्टने (Flipkart) महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाशी (MSKVIB) एक सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे महाराष्ट्रातील स्थानिक कारागीर, विणकर, कारागीर आणि एसएमबीला ई-कॉमर्सच्या व्यासपीठावर आणण्यास मदत होईल. फ्लिपकार्टच्या ‘समर्थ’ (Flipkart Samarth) या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन विक्री व्यासपीठावर विक्री करण्याच्या सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्यमंत्री, उद्योगमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. करारानुसार आता पैठणी साडी, सावंतवाडी लाकडी खेळणी, हिमरु शाली अशा वेगवेगळ्या हस्तकला जागतिक पातळीवर विक्री करता येतील.

या भागीदारीमुळे महाराष्ट्राचे स्थानिक कारागीर, विणकर आणि उद्योगांना देशभरातील कोट्यावधी ग्राहकांना खादी, पैठणी साड्या, लाकडी खेळणी, हस्तनिर्मित कलाकृती, दागदागिने, कागदी वस्तू, पर्स आणि इतर महत्त्वाची हस्तकलेची उत्पादने दाखवणे शक्य होणार आहे. यामुळे सरकारच्या #VocalforLocal प्रयत्नांना चालना मिळेल. महाराष्ट्र सरकारचे उद्योग व खाण मंत्री सुभाष देसाई म्हणाले, ‘राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एमएसएमईची मोठी भूमिका असते आणि राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी ते महत्त्वपूर्ण असतात.’

या कार्यक्रमांतर्गत हस्तकला व हातमाग कारागिरांनी त्यांच्या वस्तु या ऑनलाईन विक्री व्यासपीठावर विक्रीस ठेवल्यास पहिल्या सहा महिन्यापर्यंत मे. फ्लिपकार्ट यांच्यामार्फत कोणतेही कमिशन आकारण्यात येणार नाही. या वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या कारागिरांना त्यांच्या 100 वस्तुंपर्यंत फोटोग्राफी विनाशुल्क करण्यात येणार आहे. याशिवाय कारागीरांना त्यांच्या वस्तुंची ऑनलाईन विक्री व पॅकेजिंग करण्याचे प्रशिक्षण विनाशुल्क देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन विक्रीची  सुरुवात  महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या  मऱ्हाटी महाराष्ट्र विक्रीदालन, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई येथून करण्यात येणार आहे. (हेही वाचा: Coronavirus Vaccination: मुंबईतील खासगी रुग्णालयात लसीकरण पुढील आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता)

या ऑनलाईन व्यापक स्वरुपाच्या बाजारपेठेत हस्तकला व हातमाग कारागीरांनी  उपलब्ध होत असलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यशासनाने केले आहे. फ्लिपकार्ट समर्थ कार्यक्रम 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता. सध्या याद्वारे भारतभरातील 7,50,000 हून अधिक कारागीर, विणकर आणि इतर हस्तकला कामगारांना मदत मिळत आहे.