कर्जत-जामखेड, कोथरूड, कणकवली, परळी, सातारा लोकसभा निवडणूक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष; काही शे, हजारांत सामना सुटण्याची शक्यता
Five Key Fights in Maharashtra Assembly Elections 2019 | (Photo credit: Archived, edited, representative images)

Five Key Fights in Maharashtra Assembly Elections 2019: कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed), कोथरूड (Kothrud), कणकवली (Kankavali), परळी (Parli) या विधानसभा तर सातारा लोकसभा (Satara Lok Sabha Bypoll election) पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये या सर्वच लढती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. कर्जत जामखेड हे मंत्री आणि भाजप उमेदवार राम कदम विरुद्ध शरद पवार यांचे नातू रोहित पवार, कोथरुड येथे चंद्रकांत पाटील विरुद्ध भाजप-शिवसेना सोडून सर्वपक्षीय, परळी येथे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा पारंपरीक, कणकवली येथे नितेश राणे पर्यायाने नारायण राणे विरुद्ध शिवसेना तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसेले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील असा सामना रंगत आहे.

परळी: दादा की ताई?

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी पारंपरीक लढत पाहायला मिळते. हा सामना या आधीही अत्यंत चुरशीचा झाला आहे. या वेळीही या निवडणुकीत अत्यंत काट्याची टक्कर पहायला मिळते. महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या दिवसाच्या दोन दिवस आगोदर या मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन अत्यंत वाद निर्माण झाला होता. या व्हिडिओनंतर पंकजा मुंडे यांना आलेली कथीत भोवळ आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी भावांनी आमच्या बहिण भावाच्या नात्यात विष कालवले. व्हिडिओ पाहून जगण्याचीच इच्छा राहिली नाही, असे काढलेले भावनिक उद्गार कमालीचे महत्त्वाचे ठरले. या पार्श्वभूमिवर परळीची जनता कोणाला संधी देते याबाबत उत्सुकता आहे.

कर्जत: पुन्हा राम शिंदे की रोहित पवार यांच्या रुपात नव्या चेहऱ्याला संधी?

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राज्यभरात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय. येथून मंत्री आणि भाजप उमेदवार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोहित पवार असा सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवार तोडीस तोड आहे. अर्थात राम शिंदे हे मंत्री आणि या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे मैदान परिचयाचे आहे. रोहित पवार मात्र या मतदारसंघासाठी अत्यंत नवा चेहरा असून, ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यात रोहित पवार यांच्या नावामागे शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे असे बिरुद चिकटल्यामुळे या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.

कणकवली: राणे विरुद्ध ठाकरे

कणकवली विधानसभा मतदारसंघात सतिश सावंत विरुद्ध नितेश राणे असा सामना रंगला असला तरी तो वरवरचा आहे. खऱ्या अर्थाने या संघर्षाला नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी किनार आहे. महाराष्ट्रभर भाजप-शिवसेना युती असताना इथे युतीत बिघाडी झाली. कणकवली मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे भाजपच्या तर सतीश सावंत हे शिवसेना तिकीटावर उभे आहेत. राणे यांच्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सावंत यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या आहेत. त्यामुळे इथली निवडणूक चुरशीची झाली आहे. (हेही वाचा, मराठवाडा: चुरशीच्या लढतीत बीड, परळी, लातूर, निलंगा येथून कोण मारणार बाजी? पंकजा मुंडे-धनंजय मुंडे, क्षीरसागर काका-पुतणे जनतेची कोणावर मर्जी?)

कोथरुड: आमदार घरातला की बाहेरचा?

विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींना यांना डावलून भाजपने अचानकपणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव या जागेसाठी घोषीत केले. लागलीच पाटील यांना पक्षाचे तिकीटही जाहीर झाले आणि कोल्हापूरचे पाटील पुण्यातील कोथरुडमध्ये दाखल झाले. दरम्यान, कोथरुड हा मतदारंसघ परंपरागत भाजपकडे असला तरी, या वेळी घरचा आणि बाहेरचा असा सामना रंगत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात शिवसेना, भाजप वगळात इतर सर्व पक्षंनी मनसे उमेदवार किशोर शिंदे यांच्या मागे ताकद उभा केली. त्यामुळे ही लढत पाटील यांच्यासाठी सोपी नाही, हे नक्की.

सातारा लोकसभा पोटनिवडणूक: राजे विरुद्ध महामहिम

सातार लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूक ही महाराष्ट्रासाठी उत्सुकतेचा विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडूण आल्यावर उदयनराजे भोसले यांनी अवघ्या तीन महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे एका अर्थाने या मतदारसंघातील जनतेवर ही निवडणूक लादली अशीच चर्चा सुरु झाली. पदाचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजप प्रवेश दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अगदी विचारपूर्वक माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे इथे आता राजे विरुद्ध महामहिम असा सामना रंगला आहे. श्रीनिवास पाटील हे या आधी दोन वेळा लोकसभा खासदार राहिले आणि ते शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. या आधी ते सिक्कीमचे राज्यपालही होते.

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढतो आहे. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी अनेक दावे प्रतिदावे केले आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे हे विधानसभा निवडणूक मतमोजणी नंतरच दिसाणार आहे.