पावसाळ्यात मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या दरम्यान यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी केल्यास त्याचा परिणाम ह्या सागरी जीवांच्या प्रजोत्पादनावर होतो. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन 1 जून ते 31 जुलै 2019 या कालावधीत राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी जाहीर करण्यात आली आहे. ही बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगरयांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही, असा आदेश राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने जारी केला आहे.
जून आणि जुलै महिन्यातील मासेमारी बंद केल्यामुळे सागरी जीवांच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. तसेच खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छिमारांची मोठ्या प्रमाणावर होणारी जीवित व वित्तहानी टाळणेही शक्य होते. त्यामुळे सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत या राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.
बंदी कालावधीमध्ये मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार गलबत आणि त्यात पकडण्यात आलेले मासे जप्त करण्यात येणार आहे. तसेच संबंधित मच्छिमारांवर कठोर कारवाईही करण्यात येईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाने दिला आहे.
यंदाच्या वर्षात कमी पावसाची शक्यता, स्कायमेट हवामान खात्याचा अंदाज
बंदी काळात मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही. मच्छिमार सहकारी संस्थांच्या नौका मासेमारी करताना आढळल्या तर अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.