
कोल्हापूर (Kolhapur) येथील राजाराम सहकारी साखर कारणान्यास (Shri Chhatrapati Rajaram Sahakari Sakhar Karkhana) आज (शुक्रवार, 28 फेब्रुवारी) सकाळी भीषण आग लागली आहे. नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे पाच ते सहा बंब आणि जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. आग आटोक्यात आणण्याठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, कारखाना परिसरात ज्वालाग्राही घटक मोठ्या प्रमाणावर असल्याने आग आटोक्यात आणण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. आगीमुळे परिसरात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोटच्या लोट पाहायला मिळत आहे. आगीची घटना समजताच परिसरातील नागरिकांनी कारखाना (Rajaram Sahakari Sakhar Karkhana) परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
ठिगणीचे रुपांत आगीत
कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कारखान्यात एका ठिकाणी वेल्डींगचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच एक ठिणगी उडाली. ज्यामुळे मोठी आग भडकली अशी प्राथमिक माहिती आहे. सुरुवातीला आग विझवण्यासाठी कारखान्यातील कामगारांनी प्रयत्न केले. मात्र, ही आग नियंत्रणाबाहेर जात असल्याचे अल्पावधीतच त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अत्यंत तातडीने कोल्हापूर पोलीस आणि अग्निशमन दलास कळविण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, कोणताही विलंब न लावता अग्निशनम दलाचे जवान आणि पाच ते सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अधिकृतरित्या समजू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार, कारखान्यातील बगॅसला आग लागली आणि ती पुढे भडकली. आगीमध्ये कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीमुळे कारखान्यातील साहित्य आणि वायरींग जळू लागल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा, Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक; कलाकारांना अश्रू अनावर)
राज्यातील कारखान्यांचे गाळब बंद
महाराष्ट्रात सर्वत्र ऊस गाळपाचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे बहुतांश कारखान्यांनी गाळप बंद केले आहेत. कारखान्यांचे पट्टे पडल्याने गाळपाचेही काम बंद आहे. तरीसुद्धा कोल्हापूर हा जिल्हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने राजाराम सहकारी साखर कारखान्यात गाळप सुरु होते की, बंद याबाबत माहिती मिळू शकली नाही. अर्थात अनेकदा गाळप बंद झाले तरी संपूर्ण वर्षभर इतर कामे सुरुच असतात. त्यामुळे गाळपाच्या दृष्टीने कारखाना बंद झाला असे म्हटले तरी, कार्यालयीन कामे आणि इतर विभाग सुरुच राहतात. कारखान्यास लागलेली आग नेमकी कोणत्या भागात लागली आहे याबाबतही माहिती मिळू शकली नाही. ही आग कोणत्या विभागास लागली आहे त्यावरुन संभाव्य नुकसान ठरु शकते.