
गायक उमेश खाडे (Umesh Khade) उर्फ शंभो याचे ‘भोंगळी केली जनता’ हे रॅप गाणे तीन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाले. मात्र आता या गाण्यामुळे गायक उमेश खाडे अडचणीत आला आहे. या गाण्यात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे उमेश खाडेविरुद्ध वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गाण्यामध्ये उमेशने गरिबांची व्यथा मांडली आहे. वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जाधव यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे खाडे याच्याविरुद्ध भादंवि कलम 505 (1) (2) आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, त्यांना सीआययु अधिकार्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या, ज्याच्या आधारे उमेशला गुरुवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले. सुमारे तासभर त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी उमेशने सांगितले की, देशातील अनेकांचे दुःख प्रतिबिंबित करेल असे गाणे त्याला तयार करायचे होते.’
याआधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘भोंगळी, हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणे हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा.’
आव्हाड पुढे म्हणतात, ‘पोर-पोरींनो व्यक्त व्हा, फासावर लटकवणार का, मी कायम तुमच्या बरोबर आहे. आपला गळा दाबत आहे. तुकाराम जेलमध्येच बसले असते, ह्यानी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुश्य भर जेल मध्ये बसवले असते. विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे.’ रॅपर उमेश खाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्याची भेट घेतली आहे. (हेही वाचा: मुंबई पोलिसांना शहरात 3 दहशतवादी घुसल्याचा कॉल; पोलीस प्रशासन अलर्टवर)
दरम्यान, याआधी रॅप गाण्यातून राज्यातील भाजप व शिंदे गटाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रॅप गायक राज मुंगसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज याने बनवलेल्या एका गाण्यात आक्षेपार्ह शब्द असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.