Fake Paneer (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात पनीर (Paneer) हा अनेकांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे, विशेषतः शाकाहारी लोकांसाठी. पण गेल्या काही वर्षांत, बनावट पनीरच्या घटनांनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. अनेक शहरांमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी अनेक कारवाया केल्या, ज्यामध्ये हजारो किलो बनावट पनीर जप्त केले गेले. या पनीरमध्ये पाम तेल, स्किम्ड मिल्क पाउडर आणि धोकादायक रसायने वापरली जातात, ज्यामुळे हृदयरोग, यकृताचे नुकसान आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. बनावट पनीर किंवा चीज ॲनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे.

पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे. पनीर हे पारंपरिकपणे दूधापासून बनवले जाते, ज्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्त्वे असतात. मात्र, बनावट पनीर, ज्याला कधीकधी ॲनालॉग पनीर असेही म्हणतात, हे दूधाऐवजी स्वस्त सामग्री जसे की स्किम्ड मिल्क पाउडर, पाम तेल, स्टार्च, मक्याचे पीठ आणि औद्योगिक रसायने यापासून तयार केले जाते. हे पनीर दिसायला आणि चवीलाही खऱ्यासारखे असते, पण त्यात पोषणमूल्य जवळपास नसते आणि दीर्घकालीन सेवनामुळे आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते.

मंत्री झिरवाळ यांनी सांगितले, पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज ॲनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून येते. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, तसेच 2011 आणि 2022 मधील नियमानुसार ही कारवाई केली जाईल. अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) 2020 च्या नियमांनुसार, विक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती ग्राहकांसमोर मांडणे बंधनकारक आहे.

रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स, डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे. रेस्टॉरंट, हॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास  आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील चीज ॲनालॉग वितरकांचे खरेदी-विक्री बिले तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, हॉटेल, रेस्टॉरंट, फास्ट फूड विक्रेते आणि केटरर्स यांची खरेदी बिले तपासून, पनीरच्या ऐवजी ॲनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्यास, किमान 10 आस्थापनांची सखोल तपासणी करून अन्न नमुने घेऊन घाडी-जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा: Fake Paneer Test Video: गौरी खानच्या 'Torii' रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएंसरच्या आयोडीन चाचणीचा व्हिडिओ व्हायरल)

उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, नियम व नियमन 2011 तसेच अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायिक परवाना व नोंदणी) नियमन 2011 मधील तरतुदींनुसार तात्काळ परवाना निलंबनाची कार्यवाही केली जाईल. एफडीएने हॉटेल असोसिएशनसह कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये मेन्यू कार्डवर ॲनालॉग पनीरचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. याशिवाय, ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे नियोजन आहे. ग्राहकांसाठी सर्व खाद्य पदार्थांच्या घटकांची आणि पोषणमूल्यांची माहिती दर्शवणे अनिवार्य आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.