Maha Vikas Aghadi: मविआ सरकार अल्पमतात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांची कसोटी; काय सांगते आकडेवारी?
Uddhav Thackeray, Shiv Sena |

विधानपरिषद निवडणुकीनंतर (MLC Elections 2022) झालेल्या पराभवामुळे महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार अल्पमतात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपने या निवडणुकीत 134 मते मिळविल्याने भाजपचा गड अधिक मजबूत झाल्याचे आकडेच दर्शवतात. दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडीला मात्र काहिसा धक्का बसल्याची चित्र आहे. त्यामुळे भाजप आता अविश्वास ठरावाद्वारे थेट शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) प्रणित महाविकासआघाडी सरकारलाच सुरुंग लावते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राजकीय स्थितीही या चर्चेळा बळ मिळेल अशीच आहे. असे असले तरी खरोखरच हे शक्य होईल? महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी 145 हा आकडा जादूई आहे. जो पक्ष किंवा आघाडी 145 हा आकडा किंवा त्याहून अधिक आमदार जमवणार त्यांचे सरकार बनणार हे निश्चित. त्यामुळे बहुमताच्या आकड्याचा विचार करु पाहता भाजप केवळ 11 आमदार संख्येने (विधानपरिषद मतदान आकडेवारी गृहित धरता) दूर असल्याचे दिसते. ही संख्या जमवली आणि मविआला मागे टाकणाऱ्या वरच्या संख्येचे गणित जमले तर भाजपचा सत्तेत येण्याचा मार्ग पुन्हा मोकळा हे निश्चित. परंतू, हे सोपे आहे का? याबाबत काय सांगते आकडेवारी? घ्या जाणून.

एकनाथ शिंदे यांच्यामुळे 'कहाणी में ट्विस्ट'

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यापासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत 11 आमदार असल्याचे वृत्त आहे. सध्या ते गुजरातमधील सुरत येथील हॉटेल ली मेरीडीन येथे असल्याचे समजते. भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांचीही त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. भाजपला 11 आमदार कमी पडणे आणि तेवढेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणे हे फारच विशेष आहे. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार हा आकडा आता 25 वर पोहोचला आहे.

संख्याबळाचे गणित

भाजपने जर ठाकरे सरकारवर अविश्वास आणलाच तर गणित कसे असेल? या प्रश्नाचे उत्तर आकडेच देतात. विधानसभेवर निवडून आलेले भाजपचे स्वत:चे असे 106 आमदार आहेत. त्यांना अपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. अपक्षांचा पाठिंबा पाहिला तर ती संख्या 113 इतकी होते. मात्र, गुप्त मतदान पद्धतीद्वारे झालेल्या निवडणुकीत आमदारांनी केलेले मतदान पाहता तो आकडा भाजपच्या बाजूने झुकतो आणि तो 134 इतका होतो. भाजपच्या गोटात 20 मते आलीच कशी हा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होतो आहे. पण खरोखरच ही मते वळविण्यात भाजपला यश आले असले तर ठाकरे सरकार अल्पमतात आहे, असा अर्थ काढला जाऊ शकतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांची कसोटी

एकनाथ शिंदे हे दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ते नेमका काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची कसोटी लागणार हे निश्चित.

अपक्ष आणि छोटे पक्ष किंगमेकर

एमआयएम-2

समाजवादी पार्टी- 2

मनसे-1

बहुजन विकास आघाडी- 3

प्रहार - 2, माकप- 1

स्वाभिमानी संघटना- 1

रासप-1, जनसुराज्य -1

शेकाप- 1

क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1

एकूण-16

अपक्ष आमदारांची संख्या 13 आहे.

उघड पाठिंब्याला आमदार तयार होतील का?

अर्थात ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा दावा करता येऊ शकतो. मात्र, ठाकरे सरकार कोसळेल असा अर्थ लगेचच काढणे फारसे उचित ठरणार नाही. कारण, विधिमंडळात जेव्हा अविश्वास ठराव येतो तेव्हा मतदान गुप्त पद्धतीने होत नाही. आमदारांना उघडपणे आपले मत व्यक्त करावे लागते. त्यामुळे गुप्तपणे भाजपला मतदान करणारे आमदार उघडपणे भाजपला पाठिंबा देतीलच असे नाही. त्यामुळे आगामी काळात काय घडते हे पाहणेच महत्त्वाचे.