Maharashtra Assembly Elections 2019: ... म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली: छगन भुजबळ
Balasaheb Thackeray, Chhagan Bhujbal, Uddhav Thackeray, Ajit Pawar | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या अटकेबाबत अखेर मौन सोडले आहे. बाळासाहेब यांना अटक करणे ही आमची चूक होती. असे सांगतानाच त्यांना अटक करताना इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली होती. काही विशिष्ठ परिस्थितीत आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे. ऐन निवडणुकीच्या भरात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेचा मुद्दा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही एक चूक होती. काही वरिष्ठांच्या हट्टापायी हा निर्णय घेण्यात आला', असे विधान केले होते. अजित पवार यांनी हे विधान करताना कोणाचाही नामोल्लेख केला नव्हता. परंतू, त्यांच्या विधानावरुन प्रसारमाध्यमांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे आपल्या वृत्ताचा रोख वळवला होता.

'बाळासाहेबांना अटक करणे ही चूक'

अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीच्या एका कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबत विधान करताना अजित पवार यांनी म्हटले होते की, 'बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे हा निर्णय तेव्हाही आम्हाला पटला नव्हता. तो चूक आहे असे वाटत होते. परंतू, तेव्हा आम्ही निर्णयप्रक्रियेत नव्हतो. आम्ही तेव्हा अगदीच छोटे नेते होतो. त्यामुळे आम्ही जेव्हा विचारले तेव्हा, आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत. त्यामुळे आम्हाला योग्य वाटेल तो निर्णय आम्ही घेणार असे सांगण्यात आले होते.', असे अजित पवार यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले होते.

'शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्‍यांचे बाप'

दरम्यान, अजित पवार यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरत हिंमत असेल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेसाठी छगन भुजबळ जबाबदार होते, असे अजित पवार यांनी सांगून दाखवावे. बाळासाहेब अटक प्रकरणी छगन भुजबळ यांचे नाव घ्यावे, असे आव्हान ठाकरे यांनी दिले होते. तसेच, 'बाळासाहेबांना अटक करणे ही चूक असल्याचे ते आता सांगत आहेत. परंतू, पण शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्‍यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही,' असेही ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांतूनही हा मुद्दा चर्चेत राहीला. (हेही वाचा, शिवसेनेचा वचननामा फडफडणारा कागद नव्हे तर, महाराष्ट्र कल्याणाचे शिवधनुष्य: उद्धव ठाकरे)

'काय म्हणाले छगन भुजबळ'

दरम्यान, अजित पवार यांचे वक्तव्य आणि उद्धव ठाकरे यांचे आव्हान अशी जुगलबंधी सुरु झाल्याचे पाहून छगन भुजबळ यांनी मौन सोडत खुलासा केला आहे. '1999मध्ये प्रचार सुरू केला, तेव्हा आमच्या वचननाम्यात श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य कारवाई करू, असं म्हटलेलं होतं. त्यानंतर 1995मध्ये युतीचं सरकार आलं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरूद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच होती. नंतर ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. पण हा मुद्दा आता संपला आहेट', असे सांगत छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला आहे.