Mumbai local: मुबई लोकलमधून प्रवासाठी सर्वांनाच मिळणार परवाणगी!  रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात  आज पार पडणार बैठक
Mumbai Local | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सर्व महिलांना मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करण्यासाठी आजपासून परवानगी मिळाली. अशीच परवानगी सर्वसामान्य मुंबईकर आणि नागरिकांना कधी मिळणार याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. दरम्यान, नागरिकांना आता अधिक काळ प्रतिक्षा करवी लागणार नाही. लवकरच सर्वसामान्य नागरिकांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळू शकते. रेल्वे (Railway Administration) आणि राज्य सरकार (State Government) यांच्यात आज (बुधवार, 21 ऑक्टोबर) एक बैठक पार पडत आहे. या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

सरकारने जाहीर केल्यानुसार आतापर्यंत केवळ राज्य सरकार, केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच पालिका कर्मचारी, सरकारी आणि खासगी रुग्णालय कर्मचाऱ्यांना रेल्वे (मुंबई लोकल) प्रवासाची मुभा आहे. हाता याचीच व्याप्ती वाढवत खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शक्यता कितीही वर्तवली तरी प्रत्यक्ष निर्णय हा आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतच होऊ शकतो. त्यामुळे अप्पर मुख्य सचिव (गृह विभाग), मध्य आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक, मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, मुंबई महापालिका, महसूल विभाग अधिकारी यांच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या बैठकीत लोकल्स संख्या, वाहतूकीचे नियोजन, त्याच्या वेळा या सर्वांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Mumbai Local Train Update: आजपासून सर्व महिला प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी; रेल्वेमंत्री Piyush Goyal यांची माहिती)

दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत काल माहिती दिली की, मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी सर्व महिलांना परवानगी देण्यात येत आहे. पियुष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.''