Mumbai Local Train Update: उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी; रेल्वेमंत्री Piyush Goyal यांची माहिती
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

गेले सहा महिने संपूर्ण देश कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. आता रुग्णांची संख्या घटत असताना सरकारने लॉक डाऊनच्या अनेक बाबींमध्ये शिथिलता आणली आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई (Mumbai) मध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु केली आहे. त्यानंतर सर्व महिलांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करु देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. या संदर्भात त्यांनी रेल्वे बोर्डाला एक प्रस्ताव पाठवला होता. आता उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु. 3 दरम्यान व सायं. 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी मराठीमधून ट्वीट करत माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु. 3 दरम्यान व सायं. 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती, त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.’

पियुष गोयल ट्वीट-

याआधी घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे या प्रवासासाठी क्यूआर कोडचीही गरज नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आज रेल्वेने राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर केला आहे. महाराष्ट्र सरकार व रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे मुंबईमधील रोज प्रवास करणाऱ्या अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे.  महाराष्ट्र सरकारने याआधी अनलॉक 5 गाईडलाईन्स अंतर्गत मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. (हेही वाचा: चेंबूर स्टेशन जवळ बेस्ट बस चालकाला हार्ट अटॅक आला अन वाहनावरील ताबा सुटला, सारे प्रवासी सुरक्षित)

मुंबईमध्ये 22 मार्चपासून लोकल सेवा बंद होती. अनलॉकमध्ये जेव्हा शिथिलता आली तेव्हा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.