Dilip Walse Patil Meet Sharad Pawar: अजित दादा गटातील दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
Sharad Pawar, Dilip Walse | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षातील अजित पवार गटाचे (Ajit Pawar Faction) नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा झाली नसती तरच नवल. दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यालाही एक पार्श्वभूमी आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांच्या निकालावरुन दावे प्रतिदावे केले जात असले तरी, वळसे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात मात्र शरद पवार गटाने बाजी मारली आहे. सहकारमंत्री आणि पाठिमागील अनेक वर्षांची परंपरा असतानाही मतदारांनी वळसे-पाटील गटाला धोबीछाड दिला आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका

महाराष्ट्राचे राजकारण आणि दिवाळी सण यांची पार्श्वभूमी पाहिली तर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि परस्परांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा यात काहीच नवे नाही. मात्र, अलिकडील काही काळात राज्याच्या राजकारणाचा ज्या पद्धतीने विचका झाला आहे, तो पाहता कोणताही राजकीय नेता खास करुन विरोधी पक्षातील दुसऱ्या एखाद्या नेत्याला भेटला तर त्याची लगेच बातमी होते. सहाजिकच वळसे पाटील- पवार भेटीचीही ती झाली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

शरद पवार यांच्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा

दिलीप वळसे पाटील हे खरे तर शरद पवार यांचे अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय. त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशाही शरद पवार यांच्यामुळेच झाला. एकेकाळी शरद पवार यांचे पीए राहिलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी आमदारकी, मंत्रीपद आणि पक्षातही विविध प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या. इतके सगळे असताना शरद पवार यांच्या वृद्धापकाळात वळसे पाटील अजित पवार यांनी केलेल्या बंडात सामिल झाले. ते केवळ सामिलच झाले नाही तर शरद पवार यांची साथ सोडत चक्क भाजपचा हात पकडून त्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. इतके सगळे झाल्यावर त्यांनी 'इतकी वर्षे राजकारणात घालवूनही शरद पवार यांना राज्यात एकहाती सत्ता का नाही मिळवता आली' असा सवाल उपस्थित करुन सर्वांनाच अचंबित केले. या पार्श्वभूमीवर या भेटीला अतिशय महत्त्व आले आहे.

अजित पवार यांच्या बंडाला वळसे पाटील यांचा पाठिंबा

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर भाजपसी हातमिळवणी करत सत्तेत भागीदारी मिळवली. इतकेच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा सांगितला. या सर्व गोष्टी करण्यामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि अजित पवार यांना पाठिंबा होता, त्यापैकी एक म्हणजे दिलीप वळसे पाटील. प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकर, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, ही शरद पवार यांच्यानंतरची पहिली फळी थेट अजित पवार यांच्यासोबत चालती झाली. जो प्रकार उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षासोबत घडला. तोच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत घडला. त्यामुळे वळसे पाटील- पवार भेटीची चर्चा होत आहे.

दरम्यान, सांगितले जात आहे की, शरद पवर यांना दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिलप वळसे पाटील यांनी त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.