
Katewadi Gram Panchayat: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगतील तलावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि दस्तुरखुद्द शरद पवार यांच्यापासून फारकत घेत अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि महामुती सरकारमध्येथ थेट उपमुख्यमंत्री पद मिळवले. असे असले तरी त्यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील अनेकांना ते मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. आता तर 'मातोश्रीं'नी म्हणजेच त्यांच्या आशाताई पवार (Ashatai Pawar On Ajit Pawar) यांनीही तशीच भावना व्यक्त केली आहे. 'मी आता 86 वर्षांची आहे. माझ्या डोळ्यांदेखत दादा मुख्यमंत्री व्हावेत', असे उद्गार त्यांनी काढले आहेत. काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. त्यांच्या वक्तव्यानंतर 'दादा मुख्यमंत्री व्हावेत ही मातोश्रींची इच्छा' असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राज्याच्या गावगाड्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या तब्बल 2,369 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडते आहे. यात पवार कुटुंबीयांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेवाडी ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या ठिकाणी अजित पवार गट विरुद्ध भाजपचा गट असा सामना रंगला आहे. उल्लेखनीय असे की, अजित पवार यांनी मतदानाचा अधिकार बजावला नाही, असे अपवादानेच घडते. या वेळीही तो अपवाद घडला आहे. अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने त्यांची प्रकृती ठिक नाही. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.
दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आई आशाताई पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिाय जाणून घेतली. या वळी त्या म्हणाल्या की, 'दादांवर सर्वाचे प्रेम आहे. माझे म्हणाल तर मी आता 86 वर्षांची आहे. त्यामुळे मला वाटतं माझ्या डोळ्यांदेखत त्यांनी मुख्यमंत्री व्हावे. आता हे शेवटचं आहे. लोकांचे काय सांगता येतं. कोणास ठाऊक ते मुख्यमंत्री होती की नाही', अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल बोलताना आशाताई पवार म्हणाले, तो आजारी आहे. ठिक आहे. पण त्याला अशक्तपणा आला आला आहे. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितले आहे. त्यामुळे तो मतदानाला आला नाही. आजकाल नव्हे तो 1956 पासून मतदान करतो आहे. त्याला लोकांचाही चांगला पाठिंबा आहे. पूर्वी काटेवाडीत काहीच नव्हते. पण आता काटेवडीमध्ये सांगता येणार नाही इतका बदल झाला आहे. लोकांचेही आमच्यावर प्रेम आहे, असे आशाताई पवार यांनी म्हटले आहे.