Western Railway (Photo Credits: File Photo)

रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या संदर्भात आता पश्चिम रेल्वे (Western Railway) आपल्या काही निवडक स्थानकांवर आणखी एक प्रयोग करणार आहे. पश्चिम रेल्वेने स्थानकांवर डिजिटल लाउंज (Digital Lounges) तयार करण्याची योजना आखली आहे. युरोपियन रेल्वे स्थानकांवरील अशाच सुविधांपासून प्रेरित होऊन पश्चिम रेल्वे आपली निवडक स्थानके आणि टर्मिनल्सवर को-वर्किंग स्पेस सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे ऑफिसला जाणाऱ्या लोकांना स्थानकांवर त्यांच्या गाड्यांची वाट पाहत डिजिटल लाउंजमध्ये काम करण्याचा पर्याय मिळेल. हा उपक्रम नॉन-फेअर रेव्हेन्यू (NFR) योजनेअंतर्गत विकसित केला जाईल.

पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी प्रवासी सुविधा योजनेवर सुमारे 1,000 कोटी रुपये खर्च केले जातील. यामध्ये प्रमुख टर्मिनस स्थानकांवर कार्यरत लोकांसाठी डिजिटल लाउंज तयार करण्याच्या योजनांचाही समावेश आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, डिजिटल लाउंजची ही संकल्पना भारतीय रेल्वेतील अशा प्रकारचा पहिला आणि अनोखा प्रयत्न आहे. या योजनेचा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे.

डिजिटल लाउंजमध्ये असलेल्या सुविधा-

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) प्रमुख टर्मिनस स्थानकांवर डिलक्स लाउंज सुरु केले आहेत. याद्वारे फ्रेश होण्यासाठी आणि थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, डिजिटल लाउंजमध्ये कार्यालयासारखा सेटअप असेल. डेस्कवर लॅपटॉप, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जर ठेवण्यासाठी पॉइंट्स असतील. याशिवाय चहा-कॉफीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. काही तासांसाठी कोलाहलापासून दूर ऑफिसचे काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे विशेष लाउंज असतील. डिजिटल लाउंजमध्ये 40 लोकांना एकत्र काम करण्याची सुविधा असेल. यात चार्जिंग पॉईंट, वाय-फाय टेबल आणि इतर आधुनिक सेटअप असतील, जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. (हेही वाचा: Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गचा अंतिम टप्पा पूर्ण; पुढील महिन्यात उद्घाटन होण्याची शक्यता)

नॉन-फेअर महसूल मॉडेल काय आहे?

गेल्या काही वर्षांत रेल्वेने प्रवासी नसलेल्या भाड्यातून महसूल गोळा करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. असे हे नॉन-फेअर रेव्हेन्यू मॉडेल सार्वजनिक वाहतूक ऑपरेटरना निश्चित भाडे संरचनेवर अवलंबून नसलेल्या स्त्रोतांकडून उत्पन्न मिळवण्याचा मार्ग देते. यामध्ये रेल्वे कोच रेस्टॉरंट उघडणे किंवा स्थानकांवर सलून बांधणे यासारख्या योजनांचा समावेश आहे. आता पश्चिम रेल्वेचे डिजिटल लाउंजदेखील त्यांच्या नॉन-फेअर रेव्हेन्यू मॉडेलमध्ये समाकलित केले जातील.