महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी केली आहे. गुलाब चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे फटका बसून महाराषट्रात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मराठवाड्यात तर शेकडो हेक्टर जमीनिचे नुकसान झाले. या पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी 436 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसेने केली आहे. राज ठाकरे यांचे पत्र मनसेच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटले?
“महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे. पंरतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील. पंरतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी फार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.” (हेही वाचा, Maharashtra Monsoon Deaths: राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 1 जूनपासून 436 नागरिकांचा मृत्यू)
मनसे ट्विट
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची राज्य सरकारकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtra pic.twitter.com/fnCIswerMO
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 29, 2021
राज ठाकरे आपल्या पत्रात पुढे म्हणात की, '' प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतू, मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही. याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच, ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करवा.''
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याने चिंता करुन नये. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सरकार म्हणून आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करु. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्याबाबतचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. मराठवाड्यात झालेल्या पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हानिहाय आढावा प्रशासनाकडून घेतला. तसेच, पाऊस कमी झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याचा दौरा करतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.