चंद्रपूर (Chandrapur) येथील काँग्रेस (Congress) नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Chandrapur District Central Co-Operative Bank) अध्यक्ष संतोष रावत (Santosh Rawat) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. रावत यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. हल्लेखोराने एकच गोळी झाडली. जी संतोष रावत यांच्या हाताला चाटून गेली. त्यामुळे संतोष रावत यांना इजा झाली नाही आणि ते सुरक्षीत बचावले. मात्र, घडल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्थी सहकारी बँकेच्या मूल शाखा कार्यालय परिसरात घडली.
मूल शहरात प्रथमच अशी घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेला. तसेच, त्याने संतोष रावत यांच्यावर हल्ला करण्याचे नेमके कारण काय हे देखील आतापर्यंत पुढे आले नाही. या प्रकरणात अद्याप तरी कोणाला अटक झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे हा हल्ला कोणी केला? त्यापाठीमागचा सूत्रधार कोण? हा हल्ला हल्लेखोराने स्वत:हूनच केला की तो कोणी घडवून आणला असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. (हेही वाचा, Satara Firing Case: साताऱ्यातील पाटण येथे गोळीबार, दोन ठार, एक गंभीर जखमी; ठाणे येथील माजी नगरसेवक मदन कदम पोलिसांच्या ताब्यात)
पोलिसांनी घटनेची दखल घेऊन तातडीने हल्लेखोरास अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. दरम्यान, झालेल्या हल्ला प्रकरणी संतोष रावत यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे की नाही याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. परंतू, नेहमी लोकांमध्ये सक्रीय असलेला एखाद्या राजकीय नेत्यावर हल्ला होणे ही बाब गंभीर मानली जात आहे. धक्कादायक म्हणजे मूल शहरात अशी घटना यापूर्वी घडली नव्हती. पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने परिसरामध्ये तर्कवितर्क आणि उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.