Patan Firing Case: सातारा (Satara) जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेले मोरणा गुरेघर धरण (Morna Gureghar Dam) परिसर गोळीबाराने हादरुन गेले आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मदन कदम (Madan Kadam) असे गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो ठाणे (Thane) येथील माजी नगरसेवक आणि एकनाथ शिंदे गटाचा कट्टर कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. पोलिसांनी मदन कदम याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु असल्याचे म्हटले आहे. गोळीबारापाठीमागे राजकीय वैमनस्य आणि पवनचक्की मधील पैशांचा वाद हे प्रमुख कारण असल्याची प्राथमिक माहिती आहे.
गोळीबार करणारा मदन कदम हा ठाणे येथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा कट्टर कार्यकर्ता तर गोळीबारात मृत्यू आणि जखमी झालेले कार्यकर्ते हे शिंदे गटाचेच नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांचे कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण शहरातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीत कार्बन नाका परिसरात गोळीबाराची ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडने घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा, Navi Mumbai Shooting: नेरूळ मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, बांधकाम व्यावसायिकाचा जागीच मृत्यू)
पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आलेली माहिती अशी की, मदन कदम आणि पीडित यांच्यात पवनचक्कीमधील पैसे आणि इतर काही राजकीय वैमनस्यातून वाद होता. या पैशांच्या वसूलीतूनच हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना कार्बन नाका परिसरातील महिंद्रा सोना कंपनीसमोर घडली.
मोर्ना गुरेघर धरण परिसरात झालेल्या या गोळीबाराची पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून आरोपीलाही अटक केली आहे. असे असले तरी धरण परिसरात ग्रामस्थांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण आहे. घडल्या प्रकारामुळे मोर्ना खोरे हादरुन गेले आहे. पैसा, वसूली आणि राजकीय वैमनस्य अशा क्षुल्लक वादांवरुनही गोळीबाराच्या आणि त्यातही हत्येच्या घटना घडत असल्याने नागरिकही हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही घटना घडण्यापूर्वी अवघ्या काही तासांपूर्वीच नाशिक येथेही असाच गोळीबार झाला होता. पुणे येथेही कोयता गँगच धिंगाणा घालतानाच्या घटना पुढे येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने राज्य स्तरावर एक व्यापक मोहीम आखून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी पुढे येत आहे.