
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP) राबवत असताना महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा अनिवार्य केली जाणार नाही, असे सांगत संभाव्य भाषा सक्तीस स्थगिती (Hindi Not Mandatory) दिल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यानी दिली. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील तमाम पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, सरकारच्या या भाषा सक्तीस तीव्र विरोध करणाऱ्या वरोधी पक्षांपैकी एक मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे () यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मीडिया मंच एक्स (जुने ट्विटर) वर लिहिलेल्या पोस्टमध्ये राज यांनी म्हटले आहे की, 'सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती.'
राज ठाकरे यांनी काय म्हटले?
एक्स (जुने ट्विटर) पोस्टवर लिहिलेल्या पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल अभिनंदन करताना स्वत:च्या पक्षाचे आणि पक्षाच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन.. सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती. (हेही वाचा, Hindi Language Maharashtra: 'हिंदी अनिवार्य नाही', राज्य सरकारची भाषा सक्तीस स्थगिती; दादा भुसे यांची माहिती)
'सक्ती मागे घेतली हे उत्तम'
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केलं पण ते करताना कधी दुसऱ्या प्रांतावर मराठी लादली नाही , त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होतात? यातून नक्की काय साध्य करायचं होतं? असो, ही सक्ती मागे घेतली हे उत्तम झालं. पण या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोकं उभे राहिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
मराठी जणांचे अभिनंदन
महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन...
सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार…
— Raj Thackeray (@RajThackeray) April 22, 2025
'ही एकजूट कायम दिसू दे'
मराठी माणूस जर असाच भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणारांच्या विरोधात असाच उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची मराठी माणसाला गृहीत धरण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे आणि राहील फक्त यावेळेस दाखवलेली एकजूट कायम दिसू दे. सरकरने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण आलं, पण ठीक आहे निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद. महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार!, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.