याआधी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते की, उद्धव ठाकरे सरकार जनतेला मास्कपासून (Mask) दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. याबाबत केंद्र आणि राज्याच्या कोविड टास्क फोर्सशी चर्चा सुरू असून, त्याबाबत निर्णय घेतला जाईल. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी सांगितले की, कोविड-19 महामारी संपलेली नाही त्यामुळे अजूनही मास्क घालणे गरजेचे आहे, यासोबतच लसीकरण वाढवणेही आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.
ते म्हणाले की, लसीकरण हे कोरोना व्हायरस संसर्गाची तीव्रता कमी करते. हे एक संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते. कोरोना व्हायरस साथीचा रोग अद्याप संपलेला नाही. आपल्याला अजून किती काळ मास्क घालावे लागतील असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र या क्षणी त्यावर भाष्य करणे कठीण आहे. सध्या तरी लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत, महाराष्ट्राने 21 फेब्रुवारी रोजी 9,504 सत्रांमध्ये 3,84,948 लसीकरण केले आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 15,41,22,242 लोकांना लस देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, 1 मे पासून 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 4,86,18,937 व्यक्तींना पहिला लसीचा डोस देण्यात आला आहे, तर 3,55,20,000 लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. (हेही वाचा: लवकरच मिळू शकते लसीकरण न झालेल्या लोकांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी; न्यायालयाने दिले 'हे' आदेश)
दरम्यान, देशातील कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर तेलंगणा, आसाम आणि हरियाणाने मास्क वगळता इतर कोरोना निर्बंध पूर्णपणे काढून टाकले आहेत्त. दुसरीकडे डेन्मार्क, स्वीडन आणि नॉर्वेने ओमायक्रॉन प्रकारचा पीक गेल्यानंतर जानेवारीच्या अखेरीस सर्व निर्बंध उठवले आहेत. यूकेने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सार्वजनिक ठिकाणी मास्कची आवश्यकता रद्द केली आहे. इटली आणि स्पेनमध्येही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची गरज भासणार नाही. मात्र, या देशांतील रुग्णालयांसह काही इनडोअर ठिकाणी मास्क अनिवार्य आहे. फ्रान्स देखील या महिन्याच्या अखेरीस सार्वजनिक ठिकाणी मास्कची आवश्यकता संपवू शकतो.