![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/06/Corona-Vaccination-380x214.jpg)
मागील वर्षी सुरु झालेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटावर मात करण्यासाठी देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील तेव्हाच लसीकरणाचा आरंभ झाला आणि 6 महिन्यांच्या कालावधीत राज्यात 1 कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. संपूर्ण देशभरात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने केला आहे.
या कामगिरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले आहे. 1 कोटी 64 हजार 308 नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, तर 3 कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली आहे. दरम्यान, कालपर्यंत राज्यात 4 कोटी 13 लाख 19 हजार 131 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. (कोविड-19 तिसरी लाट, निर्बंध शिथिलीकरण यासंदर्भात काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे? जाणून घ्या)
कोविड-19 संकटामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक परिस्थिती ही बाब अत्यंत दिलासादायक आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा घटत आहे. परंतु, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तसंच अजून लसीकरणाचा मोठा टप्पा राज्याला गाठायचा आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करणे आणि लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. (Covid-19 Vaccination in Maharashtra: कोविड-19 लसीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल)
राज्यातील लसीकरणासाठी सरकारकडून नवनवे प्रयोग करण्यात आले. ड्राईव्ह इन लसीकरण, घरोघरी लसीकरण, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घराजवळच्या लसीकरण केंद्रावर लसींची सोय यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. दरम्यान, एक-दोन महिन्यात संपूर्ण राज्याचं लसीकरण करण्याची सरकारची क्षमता आहे. मात्र लस पुरवठा नियमित करण्याचं काम केंद्रानं करावं, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे एका मुलाखतीत म्हणाले होते.