कोविड-19 तिसरी लाट, निर्बंध शिथिलीकरण यासंदर्भात काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे? जाणून घ्या
Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

राज्यात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत आली आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) धोका कायम असल्याचा अंदाज तज्ञांकडून वारंवार व्यक्त केला जात आहे. लसीकरण सुरु असल्याने लस घेतलेल्यांना निर्बंधात सूट द्यावी, असाही सूर नागरिकांचा आहे. दरम्यान, कोविड-19 तिसरी लाट, लसीकरण, मुंबई लोकलसेवा, निर्बंध शिथिलीकरण या सर्व प्रश्नांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत उत्तरं दिली आहेत. जाणून घेऊया आरोग्यमंत्री नेमके काय म्हणाले...

कोविड-19 तिसरी लाट:

तिसरी लाट येऊ शकते पण केव्हा येईल, हे खरंतर आपल्यावर आहे. आपण जर निर्बंध, कोरोना नियम पाळले तर आपल्याला नक्कीच तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. त्याचबरोबर लसीकरण हा अगदी रामबाण उपाय आहे. त्यामुळे इन्फेक्शन कमी होतं आणि झालं जरी ते अत्यंत सौम्य स्वरुपाचं असतं. लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन या जोरावर कोरोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकते. त्यामुळे त्याचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला करता येईल. (Mumbai: मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याबाबत पालकमंत्री अस्लम शेख यांचे महत्वाचे वक्तव्य)

निर्बंथ शिथिलीकरण:

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून महाराष्ट्र ICMR ने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतोय. ICMR ने सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला प्रोटोकॉल द्यावे. निर्बंध शिथलीकरणाबाबत सूचना द्यावात. कारण अलिकडेच आलेल्या केंद्राच्या टीमने निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांनी दिलेल्या सूचनांनुसारच काम करत आहोत.

लसीकरण:

एक-दोन महिन्यात संपूर्ण राज्याचं लसीकरण करण्याची क्षमता सरकारची आहे. मात्र त्याप्रमाणत लस उपलब्ध  होणे गरजेचे आहे. त्यामुळे लसपुरवठ्याची मेहरबानी केंद्राने केली तर राज्याचं सर्वात मोठं काम होईल. 60-70 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यास हर्ड इम्युनिटी म्हणजेच सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि संकटाच्या या काळात ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तसंच निर्बंध उठवण्यासाठी देखील हे अत्यंत गरजेचे आहे. सध्या हा एकमेव रामबाण उपाय असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई लोकलसेवा:

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा मिळणार का? यावर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करायला हवेत. या बाबत दुमत नाही. त्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स योग्य तो निर्णय घेतील.

दरम्यान, निर्बंध हे जनतेसाठी लागू केलेले आहेत. मात्र त्याचा दुष्परिमाणही नागरिकांवर होतो आहे. त्यामुळे यातून मध्यबिंदू काढला पाहिजे. यात मृत्यू रोखणे हे प्रथम प्राधान्य असायला हवे. जनतेने या निर्बंधांचा गैरअर्थ लावू नये. कारण तिसरी लाट आली आणि त्यात अधिक संसर्ग झाला तर त्याचीही जबाबदारी सरकारवर आहे. या सगळ्याचा विचार  करुनच निर्बंध लागू करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.