Coronavirus Vaccination: महाराष्ट्र आत्मनिर्भर व्हावा हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची इच्छा- राजेश टोपे
Rajesh Tope | (Photo Credit: Twitter/ANI)

महाराष्ट्र हा लसीकरण (Maharashtra Vaccination) आणि ऑक्सीजन च्या बाबतीत आत्मनिर्भर (Atmanirbhar Maharashtra) व्हावा हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची इच्छा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी केलेल्या अहवाहनानंतर राज्यातील अनेक साखर कारखाने ऑक्सीजन (Oxygen) निर्मितीसाठी पुढे येऊ लागले आहेत. ज्याचा राज्याला फायदा होत असल्याचेही टोपे यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे एक बैठक पार पडत आहे. या बैठकीपूर्वी राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या संवादादरम्यान ते बोलत होते.

राजेश टोपे यांनी या वेळी विविध मुद्द्यांवरुन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील आशा कर्मचारी संपावर जात असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्यातील आशा कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करुन आशा कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल. राज्य कोरोना लाटेच्या तिसऱ्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे आशा कर्मचारी आंदोलन करणार नाहीत. परंतू, ते जर आंदोलन करत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे, असेही टोपे म्हणाले. (हेही वाचा, Asha Workers on Strike: महाराष्ट्रातील 70 हजार आशा कर्मचारी आजपासून संपावर, विविध मागण्या मान्य करण्यासाठी Work From Home)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच महाविकासआघाडीची भावना आहे. परंतू, हे आरक्षण मिळताना ओबीसी आरक्षणालाही धक्का लागू नये. हा धका न लावता हे आरक्षण कसे देता येईल हे पाहिले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारचा कायदा बदलला पाहिजे. केंद्र सरकारने कायदा बदलल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकणार नाही. केंद्राने कायदा बदलला तर तो आपण स्वीकारणार असल्याचे राजश टोपे यांनी या वेळी सांगितले.

महाराष्ट्रात संक्रमनाचा आकडा अधिक आहे. तर केंद्र सरकारने महाराष्ट्राकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. केंद्राने महाराष्ट्राला अधिक प्रमाणात लसी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. आतापर्यंत 3 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप 13 कोटी जनता लसीकरणाबासून बाकी आहे. त्यामुळे योग्य प्रमाणावर लसी उपलब्ध झाल्यास उर्वरीत लसीकरण तीन ते चार महिन्यात पूर्ण करु. परंतू, त्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिक प्रमाणात लसी उपलब्ध करुन द्यावात, असे टोपे यांनी सांगितले. दरम्यान, सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथे पाच टक्क्यांपेक्षा जास्त दर आहे. त्या ठिकाणी सरकारचं बारीक लक्ष आहे. या ठिकाणीही हे प्रमाण लवकरात लवकर कमी नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे राजेश टोपे यांनी सांहिकले.

म्युकरमायकोसिस आजाराबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, काळी बुरशी आजाराचा सामना करणाऱ्या नागरिकांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील 113 रुग्णालयांमध्ये या आजाराव उपचार केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.