Coronavirus: मुंबई शहरातील कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या मंदावली? काय सांगते आकडेवारी?

राज्य आणि देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मुंबई (Mumbai) शरातून मात्र काहिसे दिसासादायक वृत्त पुढे येत आहे. प्राप्त आकडेवारीवर नजर टाकता मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या वाढीचा वेग बऱ्याच अंशी मंदावल्याचे चित्र आहे. अर्थात मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus Statistics in Mumbai) रुग्णांचा आकडा 94 हजारांच्याही पुढे आहे. जो राज्यातील आणि देशातील इतर कोणत्याही शहरापेक्षा मोठा नक्कीच आहे. परंतू, असे असले तरी या शहरातील कोरोना रुग्णवाढीचा वेग मात्र काहीसा मंदावला आहे. मुंबई महापालिका (BMC) जी आकडेवारी प्रसिद्ध करते आहे त्यावरुन तरी असे पुढे येत आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या 14 जुलैच्या आकडेवारीनुसार मुंबई शहरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 94,863 इतकी झाली आहे. त्यातील 66,633 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर 5,405 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत 22,773 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील 1,126 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

वरील आकडेवारीवर नजर टाकता मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यूदर केवळ 5.70% इतका आहे. तसेच उपचार घेऊन बरे झालेल्याच्या आकडेवारीवर नजर टाकता आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी 70% लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार सुरु असलेल्यांची संख्या केवळ 30% इतकीच दिसते. म्हणजे रुग्णालयात 23 हजारांच्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. (हेही वाचा, Coronavirus: कोरोनामुळे गेल्या तीन दिवसात महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू)

मुंबई महापालिकेने वेळोवेळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या काही महिन्यांतील कोरोना रुग्ण संख्येवर नजर टाकता असता 6 जून 2020 या दिवशी मुंबई शहरात 47,128 इतके कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद होती. हीच नोंद 14 जुलै 2020 या दिवशी 94,863 इतकी झाली. ही आकडेवारी कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दुप्पट होण्यात वाढ (डबलींग रेट) झाल्याचे दर्शवते. टक्केवारीत सांगायचे तर रुग्णवाढीचा हा दर 1.5% च्या आसपास पोहोचतो.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची डबलिंग रेट हा 50 दिवसांपेक्षा म्हणजेच दीड महिन्यांहून अधिक आहे. त्या तुलने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) हा साधारण 70% असपास आहे. प्रामुख्याने मुंबई शहरात एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेला आणि सर्वांच्याच चिंतेचा विषय राहिलेल्या धारावी, भायखळा आदी ठिकाणी कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. कौतुकास्पद असे की, धारावीतील रुग्णसंख्या घटल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही सरकारचे कौतुक केले आहे.