Coronavirus: 1 सप्टेंबरपासून 'Unlock 4' मध्ये सुरु होऊ शकतात 'या' प्रमुख गोष्टी
Unlock | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटासोबत आपण जगायला शिकले पाहिजे. असे वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ, विविध अभ्यासक, नेते आणि मान्यवर सांगत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारही याच विचारात असल्याचे दिसते. कारण, केंद्र आणि राज्य सरकार कोरोना व्हायरस प्रादुर्भाव थांबविण्यासाठी घेण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) हळूहळू अनलॉक (Unlock) करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 3 वेळा अनलॉक करण्यात आले आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 (Unlock 4) जाहीर होण्याची शक्यता आहे. एक सप्टेंबरपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यास काही महत्त्वाच्या सेवा पुन्हा होण्याची शक्यता आहे.

एक सप्टेंबरपासून अनलॉक सुरु होण्याची शक्यात असली तरी,  संपूर्ण लॉकडाऊन हटवला जाण्याची शक्यता बरीच कमी आहे. मात्र, अंशीक स्वरुपात लॉकडाऊन सुरु ठेऊन बऱ्याच सेवा सुरु केल्या जाऊ शकतात. राज्य आणि जिल्हांतर्गत वाहतूकीवरील निर्बंध हटविण्यात यावेत असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना या आधीच दिले आहेत. त्यावर विचार सुरु आहे.

दरम्यान, देशभरातील चित्रपटगृह सुरु होऊ शकतात. अनलॉक 3 जाहीर करतानाच देशभरातील चित्रपट आणि नाट्यगृहं सुरु करण्यास परवानीग मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, माहिती व प्रसारण मंत्रालयाने आढावा घेऊन निर्णय घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यावेळी त्याबाबत निर्णय जाहीर केला गेला नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मार्गदर्शक सूचना आणि तत्त्वांचा, नियम अटी यांचा काटेकोर पालन करुन चित्रिकरण करण्यास मान्यता दिल्याचे म्हटले आहे. मॉल्समधील चित्रपटगृह सुरु होण्याबाबतही उत्सुकता आहे. मात्र, मॉल्सच बंद ठेवले तर ही चित्रपटगृह सुरु होण्याची शक्यता कमी आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रातील जिल्ह्यांतर्गत वाहतूक ई-पास शिवाय सुरू होण्यासंबंधी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले संकेत; पाहा काय म्हणाले)

येत्या 1 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा (दिल्ली) प्रायोगिक तत्वांवर सुरु केली जाऊ शकते. मुंबईत मेट्रो आणि लोकल ट्रेन सेवा आगोदरपासूनच सुरु आहे. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच यातून प्रवास करण्यास मुभा आहे. यात काहीशी सवलत देऊन इतरांनाही प्रवास करण्यास मान्यता मिळू शकते.

गेले प्रदीर्घ काळ बंद असलेल्या, शाळा महाविद्यालंय पुन्हा नव्याने सुरु केली जाऊ शकतात. केंद्र सरकार याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करु शकते. तसेच, नियम व अटी घालून शाळा सुरु करण्यास मान्यता देऊ शकते. मात्र, त्याबाबतच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्यांकडे येऊ शकते.

दरम्यान, शाळा, रेल्वे, मेट्रो, चित्रपटगृह यांसोबतच मॉल्स, बाजारपेठा, सण उत्सव, खासगी समारंभ, राज्यांराज्यांमधील वाहतू, राष्ट्रीय वाहतूक, हवाईवाहतूक, जलवाहतूक, हवाई प्रवास, जलप्रवास यांसह इतरही काही महत्त्वाच्या सेवा सुरु केल्या जाऊ शकतात. मात्र, अद्यापपर्यंत तरी अनलॉक चार बाबत केंद्र किंवा राज्य सरकारांकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती, सूचना देण्यात आली नाही.