Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

देशात लॉकडाऊन (Lockdown) सुरु होऊन जवळपास 5 महिने उलटून गेले आहेत. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यात अडकलेल्या देशाला मुक्त करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र अजूनतरी यावर यशस्वी लस उपलब्ध झाली नसल्यामुळे शासनाने काही लोकांना नियमावली तयार करुन दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबत रिकव्हरी रेटसुद्धा वाढत असल्याने राज्यात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात आणखी एक पाऊल टाकत लवकरच महाराष्ट्रातील जिल्ह्यांतर्गत वाहतूकीवरील निर्बंध हटविण्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

केंद्रानं राज्यांच्या सचिवांना पत्र पाठवल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. “वस्तू व प्रवासी राज्यातंर्गत व आंतरराज्यीय वाहतुकीवरील निर्बंध शिथिल केल्यासंदर्भात केंद्रानं अलिकडचे जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांची राज्य सरकारनं दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हातंर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल,” असं अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. Vitthal Temple In Pandharpur: विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी प्रकाश आंबेडकर 1 लाख वारकऱ्यांसमवेत आंदोलन करणार

केंद्रीय गृह मंत्रालयाने 29 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार आंतरराज्यीय व राज्यांतर्गत वस्तूंची ने-आण तसेच व्यक्तींच्या प्रवासावरील निर्बंध हटवण्यात आले असून, स्वतंत्र परवानगी वा ई-पासची गरज नाही. मात्र, अनेक राज्य व जिल्हा प्रशासनांनी हे निर्बंध कायम ठेवल्याचे आढळले आहे. म्हणूनच वस्तू व व्यक्तींच्या प्रवासावर कोणतेही निर्बंध लादू नयेत, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलेलं आहे.