Vitthal Temple In Pandharpur: विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी प्रकाश आंबेडकर 1 लाख वारकऱ्यांसमवेत आंदोलन करणार
Prakash Ambedkar | (Photo Credits-Twitter/ANI)

Vitthal Temple In Pandharpur: कोरोना संकटामुळे (Coronavirus) गेल्या पाच महिन्यांपासून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर (Vitthal Temple) बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांना मंदिर खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) करणार आहेत.

या आंदोलनाचा मोठा धसका प्रशासनाला बसला आहे. देवाचं अस्तित्व न मानणारे आंबेडकर मंदिर खुलं करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाचे महत्त्व वाढले आहे. विशेष म्हणजे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे 2 लाख वारकरी आंदोलनाला येतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. (हेही वाचा - शिर्डीचे साई मंदिर खुले करावे अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार; सुजय विखे यांचा इशारा)

या आंदोलनाअगोदर जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडणार आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

दरम्यान, आज भाजप आमदार सुजय विखे यांनी शिर्डीचे साई मंदिर खुले करावे अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार, असा इशारा दिला आहे. याशिवाय त्यांनी राज्यातील सर्व मंदिरं खुली करण्याचीदेखील मागणी केली आहे.