मार्चमध्ये देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंत देशात महाराष्ट्र (Maharashtra) हे सर्वात बाधित राज्य आहे. अशात काल एक दिलासादायक बाब समोर आली होती ती म्हणजे, महाराष्ट्रात काल नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये दररोज होणारी वाढ घटत असली तरी, दिवाळी (Diwali) च्या सणावेळी पुन्हा ही संख्या वाढू शकते असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस प्रकरणातील दैनंदिन वाढ 15,000 किंवा त्याहून कमी झाली आहे. केसेसमधील वाढ कमी होत असल्याने दररोज घेण्यात आलेल्या चाचण्यांची संख्याही कमी होत असल्याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
कोविड-19 बाबत राज्याच्या तांत्रिक समितीचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले की, 'दिवाळीचा सण संपेपर्यंत आपल्या कुणालाही दिलासा मिळेल अशी अपेक्षा करू नये, असे माझ्यासह अनेक आरोग्य अधिकारी यांचे मत आहे. सणासुदीच्या काळात लोक घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता तसेच संक्रमण पसरविण्याची शक्यता वाढते.' ते पुढे म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांतील दैनंदिन प्रकरणांमध्ये होणारी थोडीसी घट म्हणजे आपण या विधाणुवर मात केली असा त्याचा अर्थ होत नाही. दुसऱ्या लाटेबद्दल सोडा पण दिवाळीपर्यंत पहिली लाटही संपणार नाही.’
सध्या सरकारने लॉक डाऊनमध्ये शिथिलता आणल्याबाबत त्यांचे मत विचारले असता ते म्हणाले. ‘आम्ही लोकांना यापुढेही घरीच रहायला सांगू शकत नाही. अनेक रोजगार धोक्यात आहेत आणि अर्थव्यवस्थेलाही पुढे जाण्याची गरज आहे. अशात आम्ही चाचण्या वाढवल्यास संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल,’ असे डॉ साळुंखे म्हणाले. टेस्टिंगमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सप्टेंबरमध्ये सुमारे 80,000 ते 90,000 चाचण्या घेतल्या गेल्या होत्या, मात्र हेच प्रमाण आता 70,000 च्या आसपास आहे. (हेही वाचा: राज्यात कोरोना विषाणूच्या बाबतीत दिलासा; काल नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट, महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 83 टक्क्यांवर)
दरम्यान, मुंबईमधील संसर्ग ऑगस्टमध्ये 13.63 टक्क्यांवरुन सप्टेंबरमध्ये 17.5 टक्क्यांवर गेला आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईतील सरासरी दैनंदिन चाचणी संख्या केवळ 11,796 होती.