कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी, देशभर सध्या कोरोनाप्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) मोहीम सुरू आहे. मात्र गडचिरोली (Gadchiroli ) जिल्ह्यातल्या दुर्गम आदिवासी (Tribal Citizens ) भागात, लसीकरणाबद्दल अफवा आणि गैरसमज पसरल्यामुळे, लसीकरणात अडथळे येत आहेत. मोरखंडी या गावातही, अशीच अडचण निर्माण झाल्यानंतर, अधिकाऱ्यांनी यावर उपाय म्हणून, एक अनोखी शक्कल लढवली आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतील, डॉक्टर आपले अवयव काढून घेतील, आपला मृत्यू होईल असे अनेक गैरसमज कोरोना प्रतिबंधक लसीबाबत राज्याच्या आदिवासी बहुल भागात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलचेरा तालुक्यातल्या देवदा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारं मोरखंडी गावही याला अपवाद नव्हतं. अधिकाऱ्यांनी अनेकदा गावकऱ्यांसोबत बैठका घेतल्या, पण लस घेण्यासाठी कुणीच पुढे येईना, तेव्हा अधिकाऱ्यांनी अनोखी एक युक्ती केली.
आदिवासी परंपरेनुसार हे गावकरी गावच्या पुजाऱ्याचाच शब्द अंतिम मानतात. मोरखडी गावात केसरी नेवलू तेलामी हे पुजारी आणि नुकतेच निवडून आलेले सरपंचही आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तेलामी यांनाच विश्वासात घेऊन मोठ्या प्रयत्नांनी लस घेण्यासाठी त्यांना तयार केलं आणि दुसऱ्या दिवशी लसीकरण सुरू झाल्यावर पहिली लस तेलामी यांनाच टोचली. यानंतर त्यांनी स्थानिक माडिया भाषेतून गावकऱ्यांना लस घेण्याचं आवाहन केलं ज्यानंतर हळूहळू गावकरी लस घेऊ लागले आणि पूर्ण गावाचं लसीकरण पूर्ण झालं. (हेही वाचा, COVID-19 Vaccination In Mumbai: मुंबई मध्ये आजपासून स्तनदा मातांनाही मिळणार Walk-in कोविड लस; पण हे असतील नियम!)
आदिवासी जनतेच्या मनातली लसीकरणाबद्दलची भीती दूर करण्यासाठी त्यांच्याच परंपरांची मदत घेऊन अधिकाऱ्यांनी लढवलेली ही शक्कल नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल.