Vaccination | Representative Image (Photo Credits: Pixabay)

कोविड 19 चा सामना करण्यासाठी आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा (Covid 19 Vaccine) वेग वाढवला जात आहे. केंद्राने मंजुरी दिल्यानंतर आता आज (25 मे) पासून मुंबईत स्तनदा मातांना (Lactating Women)  देखील कोविड 19 ची लस घेता येणार आहे. ही लस घेण्यासाठी मुंबईत या स्त्रियांना ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी थेट केंद्रांवर रजिस्ट्रेशनची सोय केली जाणार आहे. पण या महिलांना त्यांच्या स्त्री रोग तज्ञांकडून (Gynaecologist) मात्र परवानगी अत्यावश्यक आहे.

भारतामध्ये 18 वर्षांवरील सार्‍यांना लस घेण्यास परवानगी आहे. यामध्ये केवळ गरोदर स्त्रिया अपवाद आहेत. बीएमसी च्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट प्रमुख Dr Mangala Gomare यांनी HT ला दिलेल्या माहितीनुसार, ' मंगळवार (25 मे) पासून मुंबईत स्तनदा मातांना लसीकरणासाठी 'वॉक इन' पद्धतीने लस दिली जाईल. अद्याप गरोदर महिलांसाठी केंद्राकडून कोणतीही परवानगी किंवा गाईडलाईन नसल्याने त्यांनी केंद्रावर येऊ नये. दरम्यान स्तनदा मातांसाठी वॉक इन चे खास पर्याय असतील. त्यांना केंद्रावर येताना त्यांच्या स्त्रीरोगतज्ञांकडून लेटरहेड वर परवानगी पत्र आणायचं आहे. तसेच केंद्रावरही त्याबाबतचा एक कन्सेंट फॉर्म भरायचा आहे. त्यानंतरच लस दिली जाईल. ही लस आठवड्याच्या पहिल्या 3 दिवसांमध्ये वॉक ईन पद्धतीने उपलब्ध असेल.  (नक्की वाचा: COVID 19 Vaccination Fresh Guidelines: कोविड वर मात केल्यानंतर 3 महिन्यांनी मिळणार लस, आता स्तनदा माता देखील घेऊ शकतात लस; केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाची नवी नियमावली).

मुंबई मध्ये सध्या बीएमसी कडून आठवड्याचे पहिले 3 दिवस सध्या 60 वर्षांवरील नागरिकांना वॉक ईन पद्धतीने लस उपलब्ध असेल. 45 वर्षांवरील लोकांना देखील आता आठवड्याचे पहिले 3 दिवस कोणत्याही लसीसाठी नोंदणीची गरज नाही. पण गुरूवार ते शुक्रवार मात्र रजिस्ट्रेशन आवश्यक असेल. रविवारी सारी लसीकरण केंद्र बंद असतील. महाराष्ट्रात सध्या 18-44 वयोगटाचं पालिका आणि राज्य सरकारच्या हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रावर लस देण्यास स्थगिती आहे. पण 11 खाजगी हॉस्पिटल मध्ये सशुल्क लस उपलब्ध आहे. मुंबईत 16 जानेवारीपासून अंदाजे 2,980,478 जणांना लस मिळाली आहे.