भारतामध्ये कोरोनचा (COVID-19 Second Wave) थैमान रोखण्यासाठी कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड लसीच्या 2 डोस मधील अंतर वाढवण्याच्या निर्णयानंतर आज (19 मे) पुन्हा एकदा भारतात कोविड 19 ची प्रतिबंधात्मक लस (COVID-19 Vaccine) घेण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये कोविड 19 वर मात केल्यानंतर आता 3 महिन्यांनी लस मिळणार आहे तर स्तनदा मातांनाही आता लस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. या दोन प्रमुख घोषणांसोबत पहा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने(Union Health Ministry) आज जारी केल्या नव्या नियमावलीमध्ये कोणकोणते नियम आहेत.
नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन कडून स्वीकारण्यात आलेली नवी नियमावली भारतातील सार्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आल्याची माहिती आज दिली आहे. या नव्या नियमावलीत कोविड वर मात केलेल्यांना आजारातून बरे झाल्यानंतर म्हणजे 3 महिन्यांनी आता कोविड 19 ची लस मिळेल असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
काय आहेत नवे नियम
- कोविड वर मात केलेल्यांना 3 महिन्यांनी लस घेण्यासाठी पात्र ठरवले जाईल. जर कोविड 19 लसीच्या पहिल्या डोस नंतर कोरोनाची लागण झाल्यास दुसरा डोस 3 महिन्यांच्या अंतराने मिळेल.
- काही इतर गंभीर आजारामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल होणारे, आयसीयू मध्ये दाखल होणारे यांना देखील लसी साठी 4-8 आठवडे थांबावं लागणार आहे.
- आता कोविड नंतर RT-PCR Negative आल्यानंतर किंवा कोविड 19 ची लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी रक्तदान करता येईल.
- स्तनदा मातांसाठी देखील आता कोविड 19 ची लस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.
- लस घेण्यापूर्वी लाभार्थ्यांची अॅन्टिजन टेस्ट करण्याची गरज नाही.
भारतात सध्या 18 वर्षांवरील सार्यांनाच कोविड 19 प्रतिबंधात्मक लस दिली जात आहेत. देशभर 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केंद्र सरकार तर 18 - 44 वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण राज्य सरकार मोफत करत आहे. भारतात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि आता स्फुटनिक वी लस उपलब्ध आहे. कोविन अॅप, पोर्टल, आरोग्यसेतू अॅपकिंवा उमंग अॅप यांच्या माध्यमातून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तुम्हांला देशभर कोठेही लस घेता येणार आहे.