Coronavirus Vaccine Covishield (Photo Credits: Adar Poonawalla's Twitter)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिशील्ड (Covishield) लसीच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांचे अंतर ठेवण्याचा कोविड वर्किंग ग्रुपचा सल्ला मान्य केला आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी कोव्हिशिल्ड लसचा पहिला डोस घेतला आहे, आता ते लोक 12 ते 16 आठवड्यांच्या अंतराने या लसीचा दुसरा डोस घेऊ शकतील. मात्र, हे स्पष्ट केले की दोन कोव्हॅक्सिन डोस दरम्यानच्या वेळेच्या अंतरात कोणताही बदल होणार नाही. केंद्र सरकारने लसीकरणासाठी गठित केल्या नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुपने (NTAGI) ने कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली होती.

डॉ. एन.  के.  अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोविड कार्यकारी गटाने, कोव्हीशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. कोव्हीशिलड लसीच्या दोन मात्रांमधील विद्यमान अंतर 6-8 आठवडे आहे. विशेषतः ब्रिटनमधील उपलब्ध वास्तववादी पुराव्यांच्या आधारे, कोविड -19  कार्यकारी गटाने कोव्हीशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यासाठी सहमती दर्शविली.

लसीकरणाबाबत सरकारी समितीने अनेक शिफारसी केल्या होत्या. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यासोबतच, ज्यांना लॅब टेस्टमध्ये कोविड असल्याची पुष्टी झाली आहे, त्यांना रिकव्हरीच्या सहा महिन्यांपर्यंत लस देऊ नये असेही सांगितले होते. सध्या, तज्ञ रिकव्हरीच्या एका महिन्यानंतर लसीकरण करण्याची शिफारस करतात. (हेही वाचा: लसीचा पुरवठा करणाऱ्या Bharat Biotech च्या 50 कर्मचाऱ्यांना Covid-19 ची लागण; देशाची वाढली चिंता)

मार्चमध्ये, केंद्र सरकारने कोव्हिशिल्डच्या दोन डोस दरम्यान 4-8 आठवड्यांचा कालावधी असावा असे सांगितले होते. यापूर्वी ही मुदत 4-6 आठवडे होती. लॅन्सेटमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये 12 आठवड्यांचे अंतर असल्यास त्याचा प्रभाव वाढतो. युनायटेड किंगडम आणि कॅनडामध्ये लसचा दुसरा डोस चार महिन्यांनंतर दिला जात आहे.

कोविड कार्यकारी गटाची शिफारस, नीति आयोग (आरोग्य) चे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 लसीसंदर्भातील राष्ट्रीय तज्ञ गट (एनईजीव्हीएसी) ने 12 मे 2021 रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानेही, कोव्हीशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत  वाढविण्याची कोविड कार्यकारी गटाची ही शिफारस मान्य केली आहे.