काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Congress MLA Praniti Shinde) यांनी ईडी (ED) च्या कारवाया, इंधन दरवाढ यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच भाजप सत्तेमुळे मगरुर होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. "ईडी आता पान तंबाखुच्या दुकानासारखी झाली आहे. मी आज त्यांच्या विरोधात बोलत आहे म्हणून उद्या ते माझ्याही घरी येतील. देशात एकंदर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे," असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्या सोलापूरमध्ये बोलत होत्या.
"ईडीचे लोक कोणाच्याही घरी जातात आणि त्यांना उचलून आणतात. जे लोक निर्दोष आहेत त्यांना तुरुंगात टाकलं जातं. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मारणारे लोक आजही मोकाट फिरत आहेत," असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
"सत्ता मिळाली ना, लोकांचं काहीपण होऊ दे, आम्हाला फरक पडत नाही. आम्ही शेतकऱ्यांवर गाड्या नेऊ, शेतकऱ्यांना चिरडून टाकू, आम्ही लोकांना अटक करू. काय फरक पडतो? हा मगरूरपणा देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यातच दिसून येतोय, तर इकडचं काय? म्हणजे तेच एवढे मगरूर आहेत, तर इकडचे तर असणारच," असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांसह भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीकास्त्र सोडले. (हे ही वाचा: Covid-19 Vaccination In India: काँग्रेसचा पीएम नरेंद्र मोदींवर हल्ला- 'पंतप्रधानांनी जनतेला चुकीची माहिती दिली, माफी मागावी')
"काँग्रेसची सत्ता असताना सिलिंडर, घरगुती तेल, पेट्रोल-डिझेल परवडतं होतं, हे आता लोकांना कळलं आहे. आता तर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती. कसं जगावं लोकांनी? आणि त्यातही मगरूरपणा. किती अंत पाहाल देशातील जनतेचा?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष काही कामाचे नसून ते भाजपसाठी काम करत आहेत. लोकांना पेटवायचं आणि भांडणं लावायची हेच त्यांचं काम असल्याचं शिंदे यांनी म्हटलं.