सरकार स्थापन झाले तर, काँग्रेस पक्षाच्या या आमदारांमना मिळू शकते उपमुख्यमंत्री पद
Maharashtra Deputy Chief Minister | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस ( Shiv Sena-NCP Congress-Congress ) अशी एक नवीच आघाडी महाराष्ट्रात अस्तित्वात येत आहे. परस्परविरोधी आणि गेली अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात काम केलेले हे तिन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे सहाजिकच सत्तावाटपाचे सूत्र कसे अमलात येईल याबाबत उत्सुकता आहे. मात्र, ही उत्सुकता कायम असतानाच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणत्या नेत्याची किंवा कोणत्या आमदाराची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते याबाबत उत्सुकता आहे. सत्तावाटपाचा सूत्रांकडून प्राप्त झालेला फॉर्म्युला (Shiv Sena-NCP Congress-Congress power sharing Formula) विचारात घेतला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेऊ शकते. तर काँग्रेस पक्ष सलग पाच वर्षे उममुख्यमंत्री पदावर (Deputy Chief Minister) राहू शकतो. हे सूत्र प्रसारमाध्यमांतून झळकताच काँग्रेसच्या कोणत्या नेत्याची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागू शकते याबाबत चर्चा सुरु झाली आहे. काही मंडळींचे म्हणने असे की, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यापैकी एका नेत्याची वर्णी लागू शकते.

बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat | (Photo credit : facebook)

बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. थोरात हे काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. काँग्रेस विचारांची झाक त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसते. यशाने हुरळून किंवा अपयशाने खचून न जाता आपल्या भूमिकेशी ठाम राहणे. पक्षशिस्त पाळणे आणि संयत बोलणे ही थोरातांच्या व्यक्तिमत्वाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. काँग्रेस पक्षात ते ज्येष्ठ म्हणून ओळखले जातात. अत्यंत कसोटीच्या काळात त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद आले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसचे 44 आमदार निवडूण आले. त्यामुळे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपवले जाण्याची शक्यता आहे.

विजय वडेट्टीवार

Vijay Namdevrao Wadettiwar | (Photo credit : facebook)

विजय वडेट्टीवार हे देखील काँग्रेसचे एक अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. एकेकाळी शिवसेनेत असलेले वडेड्डीवार पुढे काँग्रेस पक्षात प्रवेशकर्ते झाले. गेली अनेक वर्षे ते काँग्रेस सोबत एकनिष्ट आहेत. त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ म्हणून काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शेवटच्या काळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. महत्त्वाचे म्हणजे साडेचार वर्षे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडत थेट सत्ताधारी भाजपची वाट धरली. अचानक घडलेले पक्षांतर हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता. अशा अडचणीच्या काळात वडेट्टीवार यांची निवड विरोधी पक्षनेता म्हणून झाली. अत्यंत कमी काळातही वडेट्टीवार यांनी चांगली खिंड लडवली. त्यांच्या कामाची नोंद म्हणूनही काँग्रेस पक्ष त्यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवू शकतो. (हेही वाचा, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- राष्ट्रीय काँग्रेस सरकारमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला, घ्या जाणून)

विश्वजीत कदम

Vishwajeet Patangrao Kadam | (Photo credit : facebook)

विश्वजित कदम हे काँग्रेसचे तरुण आमदार आहेत. त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले आहे. माजी वनमंत्री आणि काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे ते पूत्र आहेत. सध्या सर्वच पक्षांत तरुणाईचे वारे आहे. त्यामुळे एखाद्या तरुण आमदाराकडे उपमंत्रीपद सोपवावे हा विचार काँग्रेस पक्षात झाल्यास पतंगराव कदम यांचा विचार होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला रोखण्यासाठी तरुण आमदार विश्वजित कदम यांनाही संधी मिळू शकते.

अर्थात कोणाला उपमुख्यमंत्रीपद मिळेल या साऱ्या सध्यातरी चर्चाच आहेत. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अद्यापही सत्तास्थापनेची बोलणी सुरु आहेत. तिन्ही पक्षांचे नेते किमान समान कार्यक्रम आणि सत्तास्तापना पदवाटप यांवर चर्चा करत आहेत. या चर्चेतून काय बाहेर येते आणि पदांची माळ कोणाच्य गळ्यात पडते, यांसारखे बरेच प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही काळ तरी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.