नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासूनच महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी तर तापमान 10 अंश सेल्सिअसच्या काही गेले होते. गेल्या काही दिवसांत थंडी कमी झाली असली तरी, लवकरच राज्यातील अनेक भागात पुन्हा थंडी पडू शकते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे युनिटनुसार, 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
यादरम्यान अनेक भागात कडाक्याची थंडी पडेल आणि तापमानातही मोठ्या प्रमाणात घट नोंदवली जाईल. सध्या मुंबई आणि पुण्यातील तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून, येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, 30 जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाईल. (हेही वाचा: Mumbai Air Quality: मुंबईतील हवा प्रदुषित, शहरातील हवेची गुणवत्ता आणखीचं खालावली)
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानवर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे जो पूर्वेकडे सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे दक्षिण-पश्चिम राजस्थानवर चक्रीवादळाचे वारे वाहत आहेत. याशिवाय 27 जानेवारीला आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे आकाश ढगाळ राहील व कमाल तापमानात घसरण होईल, पण किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स हे अतिउष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे जे भूमध्य प्रदेशात उद्भवते आणि भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील प्रदेशांना हिवाळ्यातील जोरदार पाऊस देते. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात अजूनही थंडीचा कडाका कायम आहे. पिकांवर या थंडीचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. धुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला आहे.