CM Uddhav Thackeray उद्या सातारा, रत्नागिरी, पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर; जाणून घ्या कसा असेल कार्यक्रम
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये महिलांवरील अत्याचारावर चाप बसण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आता उद्या (गुरूवार दि. 10 डिसेंबर)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करतील. याआधी कोरोना काळात मुख्यमंत्री घरीच बसून कारभार पाहत असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. आता महामारीचे प्रमाण ओसरायला सुरुवात झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौऱ्यांचा धडाका सुरू केला आहे.

असा असेल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या नियोजित दौऱ्याचा कार्यक्रम -

गुरूवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 9.05 वा. जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर (ता.पाटण, जि. सातारा) कडे ते प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता कोयनानगर हेलिपॅडवर त्याचे आगमन होईल. तिथून मोटारीने ते रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पाकडे प्रयाण करतील.

सकाळी 10.50 वाजता ते पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा 4 विद्युतगृहाची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी 11.20 वाजता मोटारीने कोयना धरण (ता.पाटण, जि. सातारा) कडे प्रयाण होईल.

दुपारी 12.05 वाजता कोयना धरण येथे आगमन होईल व तिथे ते परिसराची पाहणी करतील. तिथून दुपारी 12. 40 वाजता कोयना विश्रामगृह येथे आगमन होईल.

त्यानंतर दुपारी 1.20 वाजता ते मोटारीने कोयनानगर हेलिपॅडकडे प्रयाण करतील व हेलिकॉप्टरने ओझर्डे (ता. मावळ, जि. पुणे) कडे रवाना होतील. दुपारी 2 वाजता ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन होईल व तिथून मोटारीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. 2 च्या प्रकल्पस्थळाकडे प्रयाण होईल. (हेही वाचा: महाराष्ट्रात आता बलात्कार, ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा)

दुपारी 2.20 वाजता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी होईल व त्यानंतर मोटारीने प्रकल्पाच्या कॅम्प ऑफिसकडे प्रयाण करतील. दुपारी 2.50 वाजता कॅम्प ऑफिस येथे आगमन होईल व त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली-कुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाचे सादरीकरण पार पडेल.

दुपारी ३.15 वाजता मोटारीने ओझर्डे (ता.मावळ, जि. पुणे) हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.30 ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन होईल व तिथून हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे रवाना होतील.

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी 5 डिसेंबर रोजी अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली व आढावा घेतला होता.