31 डिसेंबरच्या पार्टीसाठी जवळपास महिनाभर आधीपासूनच सर्वांचं प्लॅनिंग सुरु होतं, यामध्येही मद्यपींचा उत्साह म्हणजे खास उल्लेखनीय असतो. हाच उत्साह लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारतर्फे या मंडळींना एक न्यू इयर गिफ्ट देण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, नाताळच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 24 डिसेंबर रोजी तसेच नाताळ (Christmas) म्हणजे 25 डिसेंबर ला व नवीन वर्षाच्या रात्री म्हणजेच 31 डिसेंबर ला राज्यातील मद्य विक्री (Alcohol Selling) दुकाने पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. असं असलं तरी यादिवशी खरेदी करताना ग्राहकांनी सात्रक राहावे असे आवाहन सरकारने केले आहे, या दिवसांची मागणी पाहता अनेक परवाना विना चालणाऱ्या दुकानात नकली आणि भेसळयुक्त माल विकला जातो त्यामुळे केवळ अधिकृत दुकानातूनच खरेदी करावी अशी सूचना करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा अधिकृत दुकाने बंद झाली तरी अनेक ग्राहक विना परवाना चालणाऱ्या दुकानातून दारू खरेदी करतात, या मालाचा दर्जा विश्वसनीय नसतो त्यामुळे शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतो, हे होऊ नये तसेच आर्थिकी दृष्ट्या दारू विक्रेत्यांना फायद्याचे ठरावे याकरिता या खास दिवशी दारू विक्रीला पहाटेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली गेली आहे.
दरम्यान, सध्या वास्तविक रेग्युलर दिवशी दारू विक्री करणारी दुकाने रात्री 11 ते 12 पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी आहे तर परमिट रूम 1.30 वाजेपर्यंत सुरु ठेवले जातात, पण नवीन वर्षाच्या पार्टीच्या दिवशी ही सवलत देण्यात आली आहे. याशिवाय दारू विक्री मान्य असली तरी मद्यपान करण्याच्या नियमात कुठेही सवलत दिलेली नाही, नियमानुसार मद्यपींनी परमिट रूम मध्ये किंवा घरातच मद्यपान करावे, सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार केल्यास 5,000 पर्यंतचा दंड किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.