
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या काही घटना समोर आल्यानंतर आता या प्रवृत्तींवर जरब बसवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेतली आहे. उदयनराजेंनी अमित शहांना एक निवेदन दिले आहे यामध्ये शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर किमान 10 वर्षांची शिक्षा असणारा अजामीनपात्र कायदा पारित करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सोबतच ऐतिहासिक चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्डासह ऐतिहासिक तज्ञांची समितीही असावी या मागणीचाही समावेश आहे.
प्रशांत कोरटकर या स्थानिक पत्रकाराने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्यानंतर महिनाभर पोलिसांच्या हातावर तुरी दिली. सुमारे महिन्याभरानंतर त्याला तेलंगणामध्ये अटक करण्यात आली आहे. यासोबतच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनीही आक्षेपार्ह विधान करत एका वाहिनीला मुलाखत देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित बहुतांशी घटना काल्पनिक असल्याचा दावा केला होता. महाराष्ट्रात राहुल यांचाही निषेध केल्यानंतर त्यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती.
उदयनराजे भोसले यांचे अमित शाह यांना निवेदन
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली. राज्यकारभारात रयतेच्या सहभागाव्दारे लोकशाहीचा पाया रचला. लोककल्याणासाठी अहोरात्र आयुष्य वेचले. परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छपध्दतीने त्यांचा तसेच छत्रपती संभाजीमहाराज आणि राजमाता जिजाऊ… pic.twitter.com/2WRDCncGgR
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 27, 2025
छत्रपती उदयनराजे भोसले कोण?
छत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आहेत. सध्या उदयनराजे हे लोकसभेत भाजपा खासदार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून ते निवडून आले आहेत.