
छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होय. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे नेतृत्व स्वीकारले आणि औरंगजेबाच्या मुघल सैन्याशी धैर्याने सामना केला. नुकतेच संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारी ‘छावा’ (Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र याचीच चर्चा सुरु आहे. चित्रपटातील संभाजी महारांच्या मृत्यूचा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. हा सीन पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या निमित्ताने अनेकजण संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देत आहेत.
औरंगजेबाच्या विशाल सैन्याशी 9 वर्षे महाराजांनी यशस्वीपणे लढा दिला. 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. त्यांच्या बलिदानामुळे ते खरे धर्मवीर म्हणून ओळखले जातात. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने पकडून तुळापूर येथे आणले होते, या ठिकाणी त्यांनी प्राण सोडले. त्यानंतर, त्यांच्या पार्थिवाचे अवशेष भीमा नदीच्या काठावर सापडले, आणि स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचे अंतिम संस्कार केले. तुळापूर येथे त्यांच्या स्मरणार्थ एक समाधी बांधण्यात आली आहे, जी आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देते. तुळापूर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे, जे भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असून, ती त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक मानली जाते.
तुळापूर गावाचे प्राचीन नाव नागरगाव असून याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या आजोबा शहाजीराजे यांनी आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांची तुला केली होती. त्या तुला प्रसंगानंतरच नागरगावचे नाव बदलून तुळापूर असे ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्यात आले ते तुळापूर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ म्हणून ओळखले जाते. तर ज्या ठिकाणी त्यांच्या देहाला अग्नी देण्यात आला ते वढू बुद्रुक समाधीस्थळ म्हणून ओळखले जाते.
या दोन्ही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी बांधण्यात आली आहे. वढु बुद्रुक हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. याच ठिकाणी औरंगजेबाने एक कारागृह बांधले होते. या कारागृहात छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना ठेवले होते. वढू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांनी उभारलेली समाधी आणि वृंदावन आहे. आणि शेजारीच कवी कलश यांची सुद्धा समाधी आहे. (हेही वाचा; Free Chhaava Screening For 'Ladki Bahins': लाडक्या बहिणींसाठी 7 दिवस मोफत दाखवला जाणार 'छावा' चित्रपट; अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांची घोषणा)
दरम्यान, ज्या काळात देशातील अनेक राजे रजवाडे औरंगजेबाला आणि मोगल सत्तेला शरण जात होते, त्यांचे मांडलिक होत होते त्या काळात प्राणाचे बलिदान देऊन छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी लढत राहिले. धर्म, संस्कृती, राजकारण, राज्यकारभार, अर्थकारण, समाज व्यवस्था यावर छत्रपती संभाजी महाराजांची मते अत्यंत परखड होती. राजाने नेमके काय काम केले पाहिजे हे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज होते. छत्रपती संभाजी महाराज प्रखर धर्माभिमानी होते. धर्मकारण, अर्थकारण यात निर्विवाद वर्चस्व गाजवणारे तसेच राजकारणात निपुण होते. त्याचबरोबर ते अत्यंत कुशल संघटकही होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या खुणा आणि त्यांचा इतिहास जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.