Sudhir Mungantiwar | (Photo Credits-Facebook)

Mul Municipal Council By Election Result 2019: नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या अशा नगरपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हा धक्का अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मूल नगरपरिषद ( Mul Municipal Council) पोटनिवडणुकीत बसला आहे. या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 6 साठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजप (BJP) उमेदवार शिल्पा रामटेके यांचा पराभव झाला. तर काँग्रेस (Congress) उमेदवार ललिता फुलझेले (Lalitha Fulzele) यांचा विजय झाला. ललिता फुलझेले यांनी शिल्पा रामटेके यांचा 176 मतांनी पराभव केला.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का बसल्याचे निवडणुकीनंतर प्राप्त झालेली आकडेवारी सांगते. धक्कादायक म्हणजे देशभराप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस पक्षाचा दारुन पराभव झाला. परंतू, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मात्र केंद्रीय मंत्री राहिलेल्या हंसराज अहीर यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. या मतदारसंघात शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू धानोरकर या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. बाळू धानोरकर यांच्या रुपात या वेळी महाराष्ट्रातून लोकसभेवर काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे बाळू धानोरकर हे एकमेव उमेदवार असणार आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघनिहाय विचार करता भाजपची ताकद मोठी होती. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे केवळ 2 आमदार होते. असे असतानाही भाजपचे उमेदवार हंसराज अहीर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मात्र, त्याच्या उलट लोकसभा निवडणूक 2019 मध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे एकूण 5 आमदार होते. त्यामुळे सहाजिकच भाजपची ताकद या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये अधिक होती. असे असतानाही हंसराज अहीर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. (हेही वाचा, शरद पवार थोडक्यात वाचले, त्यांना बारामतीत पिंगा घालायला लावला: चंद्रकांत पाटील)

दरम्यान, केंद्रीय मंत्री राहिलेल्या हंसराज अहिर यांचा पराभव आणि त्यानंतर झालेल्या नगरपरिषद पोटनिवडणुकीतही भाजप उमेदवाराचा झालेला पराभव या दोन्ही गोष्टी विचारात घेता चंद्रपुरमध्ये लोकसभा ते गावपातळीपर्यंत जनतेच्या मनात वेगळा विचार सुरु आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसऱ्या बाजूला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात वेळीच डॅमेज कंट्रोल करण्याची गरज आहे. अन्यथा विधानसभा निवडणुकीत चित्र भलतेच दिसेल, अशीही दबकी चर्चा स्थानिक पातळीवर सुरु झाली आहे.