महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील कायम, तर मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा संधी
Chandrakant Patil And Mangalprabhat Lodha (Photo Credits: Facebook)

आज,  भाजप (BJP) तर्फे महाराष्ट्र व मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष पदांसाठी नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुन्हा महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची तर मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha)  यांना संधी देण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Elections)  भाजपाला मिळालेल्या धक्क्यांनंतर पक्षाची जबाबदरी आता कोणत्या नव्या खांद्यांवर सोपवली जाणार अशी मागील काही काळात चर्चा होती, मात्र भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि लोढा यांची पुन्हा नेमणूक करून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी आज याबाबत घोषणा केली.

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष म्हणून सिद्ध झाला, सत्तेपासून दूर राहिला असला तरी भाजपला सर्वाधिक म्हणजे 105 जागा जिंकता आल्या होत्या. या कामात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही बराच वाटा होता. त्यामुळे ही जबाबदारी पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्यावरच सोपवण्यात येईल अशी शक्यता होती,

दुसरीकडे मागील निवडणुकांच्या तुलनेत मात्र भाजपला यंदा कमी जागा मिळवता आल्या होत्या परिणामी बहुमत नसल्याने राज्यात सत्ता स्थापन करण्यात सुद्धा अपयश आलं होतं .याच कारणाने आता पक्षात संघटनात्मक बदल करण्याबाबत चर्चा सुरु होती. इतकचं नव्हे तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना दिल्लीला धाडून केंद्रसरकारसाठी काम कारण्यासास सांगितले जाईल असेही म्हंटले जात होते, मात्र जोपर्यंत पुन्हा राज्यात सत्ता स्थापना नाही तोपर्यंत मैदान सोडून जाणार नाही असे म्हणत फडणवीस यांनी या चर्चा खोडून काढल्या होत्या. जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही, तोपर्यंत दिल्लीवारी नाही- देवेंद्र फडणवीस

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेलेले विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक लढूनही पराभूत झालेल्या पंकजा मुंडे हे नाराज नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे यंदा भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. त्यामुळं प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याविषयी उत्सुकता होती.