पीओपीपासून तयार करण्यात येणाऱ्या गणेश आणि दुर्गा मूर्तीवर निर्बंध; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मूर्तिकारांना सूचना

महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला असून याचा फटका आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्सवावर बसण्याची शक्यता आहे. यातच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (Central Pollution Control Board) प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster of Paris) मूर्ती आणि त्यांच्या उंचीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच मूर्तीची घडण आणि विसर्जन याबाबतही उत्सव समित्यांना आणि मूर्तीकारांना सूचना करण्यात आल्या आहेत. कमी किमतीत आणि वजनाला हलके असल्याने मूर्ती घडवण्यासाठी पीओपीचा सर्रास वापर केला जातो. मात्र, पीओपीचा वापर केल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत असून जल प्रदूषणाचे प्रमाणात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे केंद्रीय प्रदुषण मंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 2010 साली मूर्तीच्या विसर्जनाबाबत काही सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरच्या दहा वर्षांत उत्सवांचे स्वरूप झपाटय़ाने बदलल्याने हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार विघटनशील, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक घटकांपासून बनवलेल्या मूर्तीना परवानगी देण्यात आली आहे. तर वाळलेली फुले, पेंढा इत्यादीचा वापर मूर्तीच्या दागिन्यांसाठी करावा असेही सांगण्यात आले आहे. तसेच मंडप, देखावे, सजावट आदी कामांसाठी प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रातील पोलीस दलातील 1001 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण तर 8 जणांचा आतापर्यंत मृत्यू

दरवर्षी केवळ गणेशोत्सवातच जवळपास 8 हजार टन पीओपी पाण्यात सोडला जातो. त्यामुळे एकूण उत्सवांचा अंदाज घेता नियंत्रण मंडळाने केलेले नियम पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु, उत्सव तोंडावर असताना ही नियमावली जाहीर झाल्याने मूर्तिकार आणि मंडळांपुढे मोठा पेच उभा राहणार आहे. सध्या गणेशोत्सवाबाबत अनिश्चितता आहे. त्यात कमी काळात मूर्ती उभारण्याची वेळ आली तर पीओपी उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे यंदाच्या वर्षी सरकारने या नियमांमध्ये शिथिलता आणावी, अशी विनंती सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

कोरोना विषाणूमुळे राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे देशात मोठ्या संख्येत बरोजगारी निर्माण झाली आहे. यातच केंद्रीय प्रदुषण नियंत्रण केंद्राने पीओपीच्या वापरावर निर्बंध घातल्यामुळे राज्यातील मूर्तीकारांमध्ये नाराजी पसरली आहे.