महाराष्ट्रातील पोलीस दलातील 1001 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण तर 8 जणांचा आतापर्यंत मृत्यू
Corona Positive Maharashtra Police | Photo Credits: File Photo and ANI/ Twitter

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. तसेच रस्त्यावर पोलीस दलातील कर्मचारी अहोरात्र गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण 1001 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 8 पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील 1 हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यापैकी 851 अॅक्टिव्ह रुग्ण, 142 जणांची प्रकृती सुधारली आणि 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांवर हल्ले केल्याची 218 प्रकरणे लॉकडाउनच्या काळात समोर आली आहेत. आतापर्यंत 770 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी सु्द्धा महाराष्ट्र सरकारने पोलीस, डॉक्टरांवर हल्ले केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सुचना दिल्या होत्या. तरीही पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.(Coronavirus: मुंबईने ओलांडला 15 हाजाराचा टप्पा, शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 15,581)

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस दलातील 55 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काम करु नये असे सांगितले आहे. तसेच पोलिसांकडून कंन्टेंटमेंट झोन आणि रेड झोन येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारांच्या पार गेला असून 19822 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत.