मुंबईस्थित P&S Jewellery विरूद्ध सीबीआयने दाखल केला गुन्हा; तब्बल 568 कोटी रुपयांची केली फसवणूक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

काही दिवसांपूर्वी रसिकलाल संकलचंद ज्वेलर्सकडून, ग्राहकांची 300 कोटींची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. आता सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ने मुंबईमधील पी अँड एस ज्वेलरी लिमिटेड (P&S Jewellery Limited) आणि तिन्ही संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या संचालकांनी आठ बँकांची तब्बल 568 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिया टुडे टीव्हीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर काही, ‘गुन्हेगारी कागदपत्रे’ सापडली.

पी अँड एस ज्वेलरी फर्म आणि त्याचे संचालक परेश शहा, साहिल शहा, विराज शहा आणि अन्य अज्ञात सरकारी कर्मचार्‍यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुंबई आणि लोणावळ्यातील 13 ठिकाणी तपास यंत्रणेने शोध घेतला होता. एका उधारदात्याने याबाबत तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नुकसान झालेल्या आठ बँकांमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय), स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, आंध्रा बँक, विजया बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचा समावेश आहे. (हेही वाचा: ग्राहकांची 300 कोटींची फसवणूक करणाऱ्या, रसिकलाल संकलचंद ज्वेलर्सच्या दोन्ही मालकांना अटक)

बँकांच्या कन्सोर्टियमने दिलेली पत सुविधा मिळवण्यासाठी ज्वेलरी फर्मने कागदपत्रांची चुकीची माहिती दिली आहे. यापूर्वी कंपनीच्या अधिका-यांनी अनेकदा बँकांकडून पत सुविधा मिळण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली होती आणि त्यातील काही बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर केली गेली आहेत. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार या ज्वेलर्सने केलेल्या फसवणुकीमुळे 578.50 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये फर्मच्या काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.