रसिकालाल संकलचंद ज्वेलर्स (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबई: घाटकोपरमधील रसिकलाल संकलचंद ज्वेलर्सने (Rasiklal Sankalchand Jewellers) ग्राहकांना फसवून, तब्बल 300 कोटींचा घोटाळा केला असल्याची माहिती समोर आले होती. या प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आली होती. आता या तक्रारींची दखल घेत, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या शोरूमचे मालक जयेश रसिकलाल शाह (वय 55) आणि निलेश रसिकलाल शाह (वय 53) यांना ताब्यात घेतले आहे. ग्राहकांची फसवून केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी रसिकलाल संकलचंद ज्वेलर्सचे दुकान बंद होते. यानंतर व्हॉट्सअॅपवरुन हे दुकान बंद करून ज्वेलर्स फरार असल्याची माहिती व्हायरल होऊ लागली. ज्या लोकांनी इथे गुंतवणूक केली होती आणि जे लोक आसपास राहत होते ते त्याच दिवशी आपले पैसे घेण्यास ज्वेलर्सच्या दुकानात पोहचले. त्यानंतर उपस्थित गुंतवणूकदारांना ज्वेलर्सकडून गुंतवणुकीच्या बदल्यात सोने वाटण्यात आले. रसिकलाल संकलचंद ज्वेलर्स बेकायदेशीरपणे पोंझी योजना चालवत होते. (हेही वाचा: Mumbai: रसिकलाल संकलचंद ज्वेलर्सकडून ग्राहकांची 300 कोटींची फसवणूक; पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल)

यामध्ये काही गुंतवणूकदारांना दागिने मिळाले, तर काही गुंतवणूकदारांना काहीही मिळाले नाही. त्यानंतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधला आणि ज्वेलर्सविरूद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करत असताना सोमवारी ईओडब्ल्यूने दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींवर कलम 420 (फसवणूक) आणि 406 (अपराधिक विश्वासघात) आणि एमपीआयडी कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची रक्कम परत करण्यात अपयशी ठरल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.