Mumbai: रसिकलाल संकलचंद ज्वेलर्सकडून ग्राहकांची 300 कोटींची फसवणूक; पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
रसिकालाल संकलचंद ज्वेलर्स (संग्रहित संपादित प्रतिमा)

ग्राहकांना गुडविन ज्वेलर्सने मोठा गंडा घातल्याचे उदाहरण ताजे असताना आता, अजून एका ज्वेलर्सने ग्राहक आणि गुंतवणूकदरांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. घाटकोपरमधील रसिकलाल संकलचंद ज्वेलर्सने (Rasiklal Sakalchand Jewellers) तब्बल 300 कोटींचा घोटाळा केला असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची रक्कम परत करण्यात अपयशी ठरल्यामुळे, शनिवारी रात्री पंत नगर पोलिस ठाण्यात रसिकलाल सकलचंद ज्वेलर्सच्या संचालकांविरूद्ध (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सचे दुकान बंद होते. यानंतर व्हॉट्सअॅपवरुन हे दुकान बंद करून ज्वेलर्स फरार असल्याची माहिती व्हायरल होऊ लागली. ज्या लोकांनी इथे गुंतवणूक केली होती आणि जे लोक आसपास राहत होते ते त्याच दिवशी आपले पैसे घेण्यास ज्वेलर्सच्या दुकानात पोहचले. त्यानंतर उपस्थित गुंतवणूकदारांना ज्वेलर्सकडून गुंतवणुकीच्या बदल्यात सोने वाटण्यात आले.

घाटकोपरचे भाजपचे आमदार पराग शहा यांनी यामध्ये ग्राहकांची मदत केली. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, ‘ग्राहकांची वाढती गर्दी पाहता 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दागिन्यांचे दुकान पुन्हा बंद झाले, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. दुकानाबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू लागली होती. शेवटी मालकाने इतर गुंतवणूक दारांनाही सोने देण्याचे मान्य केले.’ (हेही वाचा: ठाणे: Goodwin Jewellers शोरूम बाहेर ग्राहकांचे आंदोलन; 3 कोटींची फसवणूक करून मालक फरार)

रसिकालाल संकलचंद ज्वेलर्स बेकायदेशीरपणे पोंझी योजना चालवत होते. काही गुंतवणूकदारांना दागिने मिळाले, तर काही गुंतवणूकदारांना काहीही मिळाले नाही. त्यानंतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) संपर्क साधला आणि ज्वेलर्सविरूद्ध तक्रार दाखल केली. दुसरीकडे ज्वेलर्सनीही व्हॉट्सअ‍ॅप संदेशांद्वारे अफवा पसरविल्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या मेसेजमुळे आपल्या व्यवसायावर मोठा नकारात्मक परिणाम झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.