Anil Deshmukh | (Photo Credit : ANI/Twitter)

राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय (CBI) ने नवा गुन्हा दाखल केला आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करत तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा देशमुख यांच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल होताच देशमुख यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरुन तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच देशमुखांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहे.

प्रवीण मुंढे यांचा विरोधात जबाब

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख आरोपी आहेत. याच गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतरांना आगोदरच आरोपी करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या जबाबावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. मुंढे यांचा जबाब देशमुख यांच्या विरोधात आहे. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमध्ये देशमुख मंत्री असताना गिरीश महाजन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख यांचे नाव घेत आरोप केला आहे. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर देशमुख दबाव टाकत असल्याचे म्हटले होते. (हेही वाचा, Aaditya Thackeray-Uddhav Thackeray यांना खोट्या प्रकरणांत अडकवा, तपास यंत्रणांसमोर जबाब देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून अनिल देशमुखांवर दबाव असल्याचा श्याम मानव यांच्याकडून खळबळजनक दावा)

अनिल देशमुख यांनी मानले देवेंद्र फडणवीस यांचे आभार

सीबीआयने गुन्हा दाखल करताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पुर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, धन्यवाद! देवेंद्र फडणवीस, ''माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे. (हेही वाचा, Yes Bank-DHFL Fraud: पुण्याचे बांधकाम व्यावसायिक Avinash Bhosale यांना PMLA Case मध्ये 2 वर्षांनी जामीन मंजूर)

महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे!

दबावाला भीक घालणार नाही- अनिल देशमुख

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसूल करण्याचा सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात देशमुख यांना तुरुंगात जावे लागले होते. ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. प्रदीर्घ काळ ते तुरुंगात होते. अखेर न्यायालयानेच त्यांना जामीन दिल्याने त्यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.