
Student Dies Paranda: उज्ज्वल भविष्याची असंख्य स्वप्न घेऊन महाविद्यालयातून ती बाहेर पडणार होती. अशी स्वप्ने घेऊन बाहेर पडणारी ती एकटी नक्कीच नव्हती. तिच्यासोबत तिचे बीएससीच्या तिसऱ्या वर्षातील सर्व मित्रमैत्रिणी होत्या. या सर्वांना निरोप देण्यासाठी महावियद्यालयाने निरोप समारंभ कार्यक्रम सुद्धा आयोजित केला. पण, नियतीने तिचा रस्ता काही वेगळाच आखला होता. ज्यामुळे तिची अकाली एक्झिट झाली. ती सुद्धा भर कार्यक्रमात व्यासपीठावर भाषण करत असताना. होय, निरोपसमारंभाच्या कार्यक्रमात भाषण करत असताना एका विद्यार्थीनीचा जागेवरच मृत्यू (Dies While Speaking) झाला. धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील रा.गे शिंदे (R G Shinde Mahavidyalaya) महाविद्यालयात ही घटना घडली. जाणून घ्या काय घडले नेमके?
स्टेजवर बोलतानाच कोशळली वर्षा
परंडा शहरातील रा.गे शिंदे महाविद्यालय प्रांगण. विज्ञान शाखेत शिखणाऱ्या तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आयोजित कार्यक्रम सुरु होता. सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भरुन आले होते. विद्यार्थी स्टेजवर भाषण करत होते, मित्रांना निरोप देताना प्रत्येकाच्याच मनातील एक कोपरा हळवा होत होता. अशातच वर्षा खरात नावाची एक विद्यार्थीनी स्टेजवर भाषण करत होती. भाषण करताना महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आरेले अनुभव, भेटलेले मित्र मैत्रिणी आणि भविष्यातील वाटचाल यावर ती आपले विचार व्यक्त करत होती. स्टेजवरील मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थी असे सर्वच तिचे भाषण मन लावून ऐकत होते. इतक्यात अघटीत घडले. भाषण देणारी वर्षा माईकवर बोलता बोलता अचानक स्टेजवरच कोसळी. (हेही वाचा, Viral Video: मित्राच्या लग्नात तरुणाला स्टेजवर हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू, कुरनूल जिल्ह्यातील व्हिडिओ व्हायरल)
शिक्षकांची धावपळ, विद्यार्थ्यांमध्ये गलका
भाषण देताना वर्षा खरात ही विद्यार्थीनी स्टेजवरच कोसळलेली पाहून उपस्थितांमध्ये एकच कोलाहाल झाला. स्टेजवरील शिक्षक आणि मान्यवर तिच्या मदतीसाठी धावले, तर विद्यार्थी आणि तिच्या मैत्रिणींनी एकच गलका केला. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषीत केले. वर्षा हिचा स्टेजवरच मृत्यू झाला होता. तिच्या आकस्मिक मृत्युमूळ एकच खळबळ उडाली आहे. परंडा शहरातील रा.गे शिंदे महाविद्यालय आणि संपूर्ण शहरासह तिचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रांमध्ये दु:खाचे वातावरण आहे. (हेही वाचा, Viral Video: ओडिशात डिनर पार्टीदरम्यान स्टेजवर गाताना हृदयविकाराच्या झटक्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा मृत्यू, पहा व्हिडिओ)
निरोप समारंभाच्या कार्यक्रमात आयुष्यालाच निरोप
दरम्यान, विद्यार्थीनी वर्षा खरात हिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? या प्रश्नाचे उत्तर उद्याप पुढे आले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तिच्या मृत्यूपाठीमागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, तिला हृदयविकाराचा झटका आला असावा, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे. पण, या शक्यतेस अद्याप ठोस पुष्टी करेल असा कोणताही पुरावा, अथवा माहिती पुढे आली नाही.