Crime | (Photo Credits: PixaBay)

पुण्यात (Pune) अंगाचा थरकाप उडवून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'सैराट' चित्रपटाची पुनरावृत्ती करत पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील धानोरे (Dhanore) इथं गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. आपल्या बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या सूडापायी भावाने प्रियकराच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, राजू भिसे या असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून तो 25 वर्षांचा आहे. याप्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात त्या मुलीचे वडिल देखील सामील आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू गौतम भिसे याचे आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. याची खबर मुलीच्या कुटुंबीयांना लागली होती. याच कारणावरून मुलीचा भाऊ प्रतिक ओव्हाळ याने गुरुवारी मध्यरात्री राजू भिसेच्या घरी जाऊन 'माझ्या बहिणीचा नाद सोडून दे', असा समज दिला. पण, दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची उडाली. त्यानंतर प्रतिक आणि त्याच्या वडिलांनी मित्राच्या मदतीने राजू भिसेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. एवढंच नाहीतर राजू भिसेच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आला होता.हेदेखील वाचा- Palghar Murder: प्रेयसीची हत्या करुन भिंतीत पुरला मृतदेह; आरोपी प्रियकर चार महिन्यांपासून त्याच घरात वास्तव्यास

ही मारहाण पाहता राजूची आई देखील मध्ये पडली. मात्र या आरोपींनी तिलाही मारहाण केली. या मारहाणीमध्ये राजू भिसे गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या प्रकरणी राजू भिसेची आई सुनीता भिसे यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलिसांनी प्रतीक ओव्हाळ, सुनील ओव्हाळ, आशिष मोरे आणि जीवन परियार या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहे.